भिवंडी : व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक देणारा भिवंडीचा तंत्रअभियंता नदीम यासीन शेख याला भोईवाडा पोलिसांनी सात महिन्यांनंतर अटक केली. अमृतसर पोलिसांनी त्याला भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. भिवंडी न्यायालयाने गुरुवारी त्याला पोलीस कोठडी सुनावली.
लग्नानंतर काही दिवसांतच नदीम आणि त्याच्या घरची मंडळी तू आवडत नसल्याचे कारण देत पत्नी आरजूला शिवीगाळ करून मारझोड करायला लागली. नदीम हा तिच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. मात्र, आरजूने कसाबसा पाच वर्षे संसार टिकवून ठेवला. तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. तलाक देण्याआधी नदीमने घर घेण्यासाठी पाच लाखांची मागणी आरजूकडे केली होती.
मागणी पूर्ण न झाल्याने त्याने बेदम मारहाण करून तिला घराबाहेर काढले. त्यानंतर, व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक दिला. त्यामुळे हादरलेल्या आरजूने नदीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपला तलाक झाल्याचे सांगत त्याने तिला टाळण्यास सुरु वात केली. त्यानंतर, तो दुबईला गेला. त्यामुळे आरजूने भोईवाडा पोलीस ठाण्यात तिहेरी तलाकची तक्र ार दाखल केल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.