पालघर : राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षा पासून केला जात आहे. जिल्ह्यातील हजारो दिव्यांगाचा ही संस्था एक आधारस्तंभ आहे.आजही कुटुंबात, समाजात दिव्यागांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अशा दिव्यागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून अपंगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्यातरी अपंगांचे प्रमाणपत्रा सह योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यामुळे वंदे मातरम संस्था अपंगांसाठी आधार बनली आहे. ३० मार्च २०११ रोजी ह्या संस्थेची स्थापना करण्यात येऊन दिव्यांगाना आवश्यक शैक्षणकि, आरोग्य विषयक सुविधा व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे स्तुत्य कार्य ही संस्था करीत आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील गावागावात ह्या संस्थेचे कार्य सुरू आहे. त्यांच्या संस्थेला शासन पातळीवरून आर्थिक पाठिंबा मिळत नसले तरी नाउमेद न होता आपल्या व्यवसायातून आणि देणग्या द्वारे त्यांनी आपली मार्गक्रमण सुरू ठेवली आहे. जिल्हा निर्मिती पूर्वी दिव्यागांना लागणाºया प्रमाणपत्रासाठी ठाणे येथे अनेक चकरा माराव्या लागत असताना शारीरिक, मानिसक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ह्या संस्थेने डहाणू कॉटेज रुग्णालयात शिबीर भरवून प्रथम ४५० दिव्यागांना प्रमाणपत्र मिळवून दिले. आज पर्यंत २ हजाराच्या वर दिव्यागांना प्रमाणपत्रे मिळवून दिल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत सह त्यांचे सहकारी मोठ्या जिद्दीने हा लढा चालवला आहे.
पालघरमध्ये दिव्यांगांचे सबलीकरण; वंदे मातरम संस्था एक आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:22 AM