आर्थिक मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्यामुळे दिवाळीपूर्वीच निराशेचे वातावरण पसरले आहे. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम जाणवत असून पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने ग्राहकांना कोरडे हवामान पाहूनच खरेदीसाठी बाहेर पडावे लागत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली, ठाण्यातील बाजारपेठेत नेमके कसे चित्र आहे याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी जान्हवी मोर्ये, प्रज्ञा म्हात्रे यांनी.
वाळी म्हटली की पूर्वी नागरिकांमध्ये उत्साह असायचा. त्यावेळी पगार, बोनस झाल्यावरच खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी व्हायची. दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता केली जायची. घराघरातून फराळाच्या पदार्थांचे वास यायचे. पण काळानुसार दिवाळी साजरी करण्यात बदल होत गेला. पूर्वीच्या तुलनेत घरोघरी फराळ बनवला जायचा, पण महिला नोकरी करू लागल्याने तयार फराळ घेण्याकडे कल वाढू लागला. प्रसंगी खिशाला कात्री लागली तरी खर्च करायची तयारी असायची. वाढत्या मागणीनुसार या फराळांच्या किंमतीमध्येही वाढ होत गेली. खरतर, फराळाचे आता आप्रूप राहिलेले नाही. कारण हे पदार्थ आता वर्षभर मिळतात.
यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी आल्यामुळे बाजारात अद्याप म्हणावी तशी गर्दी जाणवत नसल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे. आर्थिक मंदी हे कारण असले तरी यंदा पावसाने पाठ सोडलेली नाही. पावासामुळेही खरेदीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कदाचित निवडणूक झाल्यावर खरेदीसाठी ग्राहक बाहेर पडतील असा अंदाज विक्रेत्यांनी लावला आहे. निवडणुका झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. कंदील, पणत्या विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
पिक्सल एलईडी बल्ब प्रथमच : अनिल अजवानी या विक्रत्याने सांगितले की, बाजारात विविध प्रकारचे एलईडी दिवे विक्रीसाठी आले आहेत. त्यात झुमर,कंदील,चक्र , पणती असे प्रकार आहेत. पिक्सल एलईडीमध्ये मल्टी आणि सिंगल असे दोन प्रकार आले आहेत. पिक्सल एलईडी बल्ब हे प्रथमच बाजारात यंदा आले आहेत. त्याची किंमत २५० ते ६०० रुपये आहे. इतर दिव्यांची किंमत १०० ते ४५० रुपये आहे. पावसामुळे दिव्यांच्या माळांच्या खरेदीला अद्याप सुरूवात झालेली नाही, असे ते म्हणाले.
डायमंड स्टीकरला प्राधान्य : रांगोळी व विविध रंग ग्लासमधून दिले जातात. ग्लासची किंमत प्रत्येकी १० रुपये आहे. सोनी भोजिया या विक्रेतीने सांगितले की, रांगोळीच्या स्टीकरची किंमत ३० ते ५० रुपये आहे. स्टीकर्समध्ये विविध प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. मोठे स्टीकर १२० रूपयाला आहेत. त्यावर वापरण्यात आलेल्या डायमंडमुळे ते आकर्षक दिसत आहेत. दरवाजाच्या उंबºयावर लावण्यासाठीचे स्टीकर २० ते १०० रूपयांपर्यंत आहेत. डायमंड स्टीकरला ग्राहक अधिक पसंती देत आहेत.
चिनी मातीच्या पणत्यांच्या दरांत वाढ : खंबाळपाडा येथील पणती विक्रेते संतलाल शहा यांनी सांगितले की, मातीच्या पणत्यांना जास्त मागणी आहे. ३० ते ६० रुपये दर आहे.चिनी मातीच्या पणती ४० ते ५० रूपये दराच्या आत आहेत. सागर सिद्दीकी याने सांगितले की, पणत्यांमध्ये २ ते ३ टक्के भाववाढ झाली आहे. चिनी मातीच्या पणतीला कर द्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या किंमती वाढल्या असून यंदा ६० ते ८० रूपये डझन ने बाजारात उपलब्ध आहेत.
खारकेचे दर वाढले : शैलेश चौधरी यांनी सांगितले की, ड्रायफ्रूटची मिक्स मिठाई ३८० ते ११५० रुपये दरापर्यंत बाजारात उपलब्ध आहे. काजू, अंजीर, पिस्ता, बदाम आदी प्रकारची मिठाई विक्रीसाठी आली आहे. यात भाववाढ झालेली नसली तरी बाजारात आॅर्डरसुद्धा नाही. २२ तारखेनंतर बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. चॉकलेट ५० ते ५५० पर्यंत विविध पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. केवल गाला यांनी सांगितले, की एअर स्ट्राईकमुळे बाजारात खारीक कमी आहे. त्यामुळे खारीकचे दर जास्त आहेत.किलोमागे २०० ते २५० रूपयांनी वाढ झाली आहे.