पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडोऊनबरोबरच अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने मागील ८ महिन्यांपासून काही मोजके व्यावसायिक सोडले तर उर्वरित सर्व व्यावसायिकांची आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी व गणिते अक्षरशः विस्कटली होती. मात्र दिवाळीमुळे ती काहीशा प्रमाणात सावरल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी काही व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम दिसत आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे बोईसरसह परिसरातील बहुसंख्य व्यवहार व व्यवसाय ठप्प झाल्याने नोकरदारांपासून रिक्षाचालकांसह लहानमोठ्या सर्व व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सुरुवातीला शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसून एकूण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने आर्थिक घडी विस्कळून गेली होती. तारापूरची औद्योगिक नगरीही सुरुवातीला ठप्प होऊन दैनंदिन व्यवहार थांबले होते. पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांत अनेक महिने शुकशुकाट दिसत होता. मात्र दिवाळीमध्ये एकदम चैतन्य आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्त्व जाणून ती साजरी करण्याकरिता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपरिक गोडधोड, दिव्यांची तोरणे, नक्षीदार पणत्या, रांगोळ्या, ग्रीटिंगकार्ड याबरोबरच सोने खरेदी आणि घरातील टी.व्ही., फ्रीझ, अगदी परिस्थितीनुरूप खरेदी करून दिवाळीचा सण वेगळ्या वातावरणात, साजरा करण्यात येतो, यंदा मात्र हा ट्रेंड थोडा बदलेला दिसला.
व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. दुकानासमोर आकर्षक लायटिंग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला गेला. सोन्याच्या दुकानांमध्ये काहीशी गर्दी दिसली. मिठाईच्या दुकानदारांना ऑर्डर होती, परंतु मागच्या वर्षापेक्षा जास्त व्यवसाय झाला नसल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. कापड विक्रेत्यांनी स्पर्धेमुळे कमी मार्जीनवर व्यवसाय केल्याचे सांगितले.
अनेक महिन्यांनी दिवाळीत बाजारपेठांत पुन्हा गर्दीपालघर जिल्ह्यातील बाजारपेठांत गेले अनेक महिने शुकशुकाट दिसत होता. मात्र दिवाळीमध्ये एकदम चैतन्य आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कोरोनामुळे घाऊक विक्री ठप्प झाली होती. त्यातच या वर्षी महागाईबरोबरच आर्थिक मंदीचेही सावट होतेच. परंतु दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्त्व जाणून त्यानुसार बाजारपेठा सजल्या होत्या आणि लोकांचीही खरेदीसाठी गर्दी दिसत होती.