पारोळ : दिवाळी काही दिवसांवर आली असली आणि वसई, विरार, नालासोपारा भागात दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा सजल्या असल्या तरी निवडणुकीच्या धामधुमीत ग्राहक दुकानाकडे फिरकत नसल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मतदानामुळे मागच्या आठवड्यात सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे दिवाळी आता फक्त १० दिवसांवर येऊन ठेपली असली तरीही बाजारातील धावपळ आणि उलाढाल बघायला मिळत नाही. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्यता कमी असल्याने तसेच खाजगी क्षेत्रात मंदीचे ढग असल्याने बोनसचाही ठिकाणा नसल्याने दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला आहे.
वास्तविक, दिवाळी येण्यापूर्वीच १५ ते २० दिवस बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, लाईटस्ने, कपड्यांनी फुलून जातात. यंदा मात्र कमालीची मंदी असल्याचे तालुक्यातील सर्व व्यापारी आता खुलेआम बोलू लागले आहेत. एकतर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली निवडणूक यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आल्याचे जाणवते आहे. २१ तारखेला मतदान आणि २४ आॅक्टोबरला निकाल लागल्यानंतर मात्र बाजारात गर्दी होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.