लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या असंख्य गावे व खेडोपाडयांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून नागरिकांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे धा. डहाणू, तडियाळे, गंगवाडा येथील रहिवासी पंधरा दिवस साठवलेले दूषित पाणी पीत असल्याने येथील त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य वशीदास अंभिरे यांनी केला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील तीस ते चाळीस गावात गेल्या एक महिन्यापासून एक तासही वीजपुरवठा होत नसल्याने येथील लोक कमालीचे संतप्त झाले आहेत. किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात बाडा पोखरण नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.सध्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व उदासीन कारभारामुळे नागरिकांना दररोज शुध्द व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून साखरे गावात वीजेचा सातत्याने लपंडाव होत असल्याने वाणगाव महावितरणकडून त्याची तत्काळ दुरूस्ती होत नाही.वीजेअभावी साखरे धरणाचा जलकुंभ भरला जात नाही. परिणामी ग्रामस्थांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. दरम्यान साखरे येथील जलकुंभ भरण्यासाठी जिल्हा परिषदेने तिथे जनरेटर बसवावे, अशी मागणी संबधित ग्रामपंचायतीने केली आहे. परंतु पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळयाच्या दिवसांत ग्रामस्थांना पावसाचे दूषित असे पाणी पिण्याची वेळ आली आहे.डायमेकिंग व्यवसायाला लागली घरघरविजेच्या तारा रोजच्या रोज तुटणे ही किरकोळ बाब झाली असून त्याच्या दुरूस्तीसाठी दोन, तीन तास लागणे डिओ, फ्यूज, झंपर उडणे बोईसर येथील होणाऱ्या बिघाडामुळे गाव पाडयात काळोख आहे. वीजेच्या लपंडावाने येथील डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. डहाणूच्या किनारपट्टीवरील बहुसंख्य गावात घरोघरी डायमेकिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे मोठया प्रमाणातील कुशल अकुशल कामगारांना रोजगार मिळत असतो. परंतु वीजेचाच ठिकाणा नसल्याने हजारो नागरिकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे.
विजेअभावी पाणी मिळेना
By admin | Published: July 02, 2017 5:29 AM