नालासोपारा - वसई पश्चिमेकडील रानगावात राहणाऱ्या दीड वर्षाच्या मुलाला मंगळवारी सकाळी विषारी साप चावला होता. दोन तासांनी आजीने नातवाला उपचारासाठी डी.एम.पेटिट रुग्णालयात आणले होते. तेथील डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे आणि मुलावर केलेल्या उपचारामुळे या मुलाचे प्राण वाचले आहे. गुरुवारी सकाळी मुलाला रुग्णालयातून सुखरूप घरी पाठविण्यात आले आहे.रानगावातील आजीसोबत दीड वर्षाचा आयुष पाटील हा मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेतात गेला होता. त्याला साडे आठ वाजण्याच्या सुमारास विषारी साप चावला होता. पण आजीला काहीही कळाले नाही व दोन तासांनी आयुषला उपचारासाठी वसई गावातील महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयात आणले होते. पण आजीला डॉक्टरांनी विचारणा केल्यावर काहीही सांगता आले नाही. आयुषच्या तोंडामधील हिरड्यांमधून रक्त आल्याचे डॉक्टरांनी पाहिल्यावर विषारी साप चावला असल्याचा संशय व्यक्त केला आणि उपचारासाठी आयुषला भरती करून रक्ताचे नमुने घेऊन डॉ.भक्ती चौधरी आणि टीमने विशेष दखल घेत शर्थीचे प्रयत्न सुरू केले. साप चावल्यावर देण्यात येणारा डोस देण्यात आला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मुलगा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:22 AM