मोदी लाटेत ३ लाख मते मिळविणाऱ्याला तिकिट नाही? मिळालं विधानसभेचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:45 AM2019-04-03T05:45:23+5:302019-04-04T12:47:01+5:30

श्रेष्ठींनी काढली समजूत : विधान परिषदेच्या आमदारकीचे दिले आश्वासन - विश्वनाथ पाटील

Does Modi get 3 lakh votes in ticket? Assurances of the Assembly | मोदी लाटेत ३ लाख मते मिळविणाऱ्याला तिकिट नाही? मिळालं विधानसभेचं आश्वासन

मोदी लाटेत ३ लाख मते मिळविणाऱ्याला तिकिट नाही? मिळालं विधानसभेचं आश्वासन

Next

वसंत भोईर

वाडा: श्रेष्ठींनी त्यांना एमएलसी विधान परिषदेच्या आमदारकीची उमेदवारी देण्याचे आश्वासनही दिले. तसेच, अन्य पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना दूरध्वनी केले. परंतु त्यावेळी काय चर्चा झाली याबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. व योग्य वेळी सारा खुलासा करेन असे सांगितले. त्यांनी लोकमतशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे,

प्रश्न : तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला? केवळ लोकसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून?

उत्तर : तिकिट आणि सत्तेची पदे माझ्या दृष्टीने फारच चिल्लर आहेत. ज्या समाजाचे मी प्रतिनिधीत्व करतो त्याचे कल्याण करणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, म्हणून मी २०१४ पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधलेली नव्हती. १४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहामुळे व कुणबी समाजाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे मी कुणबी सेनेचा पाठिंबा काँग्रेसला दिला होता. काँग्रेसनेही मला लोकसभेची उमेदवारी दिली होती. मोदी लाटेत ३ लाखांहून अधिक मते मिळवून मी माझ्या, तसेच कुणबी सेनेच्या व कुणबी समाजाच्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली होती. जी समज काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दाखविली तीच राजकीय समज याही
लोकसभा निवडणुकीच्यावेळी दाखविली जाईल असे आमच्या समाजाला वाटत होते. परंतु तसे झाले नाही. उलट काँग्रेस पक्षाची हानी करणाऱ्या व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली गेली. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनेने काँग्रेससाठी जो त्याग केला व आपल्या समार्थ्याचे दर्शन घडविले तिची अवहेलना काँग्रेसने केली. त्यामुळे संपूर्ण समाज काँग्रेसवर रुष्ट झाला. त्यातून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला.

प्रश्न : काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही पक्षासाठी काय केले?
उत्तर : काँग्रेसने मला ५ वर्षांपूर्वी मानाचे पान दिल्यानंतर तुम्ही सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर आणा. मग भिवंडी महापालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती अगदी नगरपंचायती , ग्रामपंचायती यांच्या निवडणुका पहा त्यात काँग्रेसने मिळविलेले यश पहा या यशाला कुणबी सेनाच कारणीभूत आहे. भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसला मिळण्यामागेदेखील तिचेच मतदान कारणीभूत आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत तिचा मान राखायला पाहिजे होता तो राखला नाही ही आमची खंत आहे. उलट ज्यांनी काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण केले, नुकसान केले त्यांना काँग्रेस उमेदवारी देते आहे हे सहन झाले नाही. ही माझी अथवा एकट्या कुणबी सेनेची भावना नाही तर काँग्रेसच्याच नगरसेवकाने बंड करून ही भावना रास्त असल्याचा प्रत्यय आणून दिला आहे. तरीही काँग्रेसश्रेष्ठी अजून जागे कसे झाले नाहीत याचे आश्चर्य वाटते.

प्रश्न : आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण समाजाचा वापर केल्याची टीका आपल्यावर केली जाते आहे त्यात कितपत तथ्य आहे?
उत्तर : भोंगळ आरोप करण्यापेक्षा मी समाजाचा कधी, कसा वापर केला व त्यातून मी माझा कोणता स्वार्थ कसा साधला याचे उदाहरण मला पुराव्यासह कुणीही द्यावे. माझ्या पाठिशी समाज ज्या एकनिष्ठेने आणि विश्वासाने उभा आहे त्याच्याशी मी कधीही प्रतारणा केली नाही व करणारही नाही. मला खासदार व्हायचे आहे तेही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी.
प्रश्न : एका विशिष्ठ समाजाच्या जोरावर निवडणूक जिंकता येईल? असे तुम्हाला वाटते?
उत्तर : निवडणूक ही एकगठ्ठा मतांच्या जोरावर अनेक ठिकाणी जिंकली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. कधी ती एक व्यक्ती, एक नेता, एक पक्ष, एक घराणे यांच्या करिष्म्यावर जिंकली जाते तशीच ती एखाद्या मतदारसंघात ज्या समाजाचे प्राबल्य असेल, संख्याबळ असेल त्याच्या पाठिंब्याच्या जोरावर जिंकता येते असा अनुभव आहे. त्यामुळेच भुजबळांना माझगाव सोडून येवला गाठावसा वाटतो. प्रकाश आंबेडकरांना अकोला सोयीचा वाटतो. इंदिरा गांधींना रायबरेली, चिकमंगळूर, अमेठी जवळचा वाटत होता.

प्रश्न : तुमची नेमकी खंत काय आहे?
उत्तर : मला लोकसभेची उमेदवारी का नाकारली हे काँग्रेसश्रेष्ठींनी सांगितले नाही ही माझी खंत आहे. एकवेळ तिकीट नाही दिले तरी चालेल पण का दिले नाही ते सांगावे, अशी माझी इच्छा आहे.

प्रश्न: एखादा निर्णय का घेतला असे कोणताही नेता, पक्ष सांगत नाही, त्याचा खुलासा संबंधितांकडे करीत बसत नाही. मला शिवसेनेतून का काढले ते सांगा असा टाहो गणेश नाईकांनी अनेक वर्षे फोडला परंतु त्याचा खुलासा शिवसेनाप्रमुखांनी अथवा शिवसेनेने कधीही केला नाही. मला मुख्यमंत्री पदावरून का काढले असा प्रश्न युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अनेकदा उपस्थित केला त्याचेही उत्तर बाळासाहेबांनी कधी दिले नाही. अशी परंपरा असतांना काँग्रेस तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देईल असे वाटते?
उत्तर: राजकीय पक्ष लोकशाही मानणारा असतो. काँग्रेस तर स्वत:ला लोकशाहीची गंगोत्री मानत आलेला आहे. त्यामुळे एखादा निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट करून सांगा अशी मागणी तोलामोलाच्या कार्यकर्त्याने अथवा नेत्याने केली तर त्यात वावगे असे काहीच नाही. ती मागणी मान्य करणे म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणे ठरेल, असे माझे मत आहे.

प्रश्न : आपला आशावाद जरी प्रशंसनीय असला आणि भूमिका लोकशाहीवादी असली तरी आपल्या पक्षाकारणात ती अनुसरली जाण्याची शक्यता नाही त्यामुळेच मनोहर जोशींना मला मुख्यमंत्री पदावरून का घालवले या प्रश्नाचे उत्तर स्वत:च शोधण्याची पाळी ओढावली व ते मला मुख्यमंत्री का केले हे जसे मीही विचारले नाही व शिवसेनाप्रमुखांनीही सांगितले नाही त्याचप्रमाणे ते पद काढून घेतल्यावर ते का काढले असे मीही विचारले नाही असे म्हणून समाधान त्यांनी स्वत:चे समाधान करून घेतले. तसे तुम्ही करणार काय?
उत्तर : मी केव्हा काय करेल? याचे उत्तर येणारा काळच देईल. तोपर्यंत मला वाटते आपण प्रतीक्षा करावी हे उत्तम. सध्या एवढेच सांगतो की, या लोकसभा मतदारसंघात ७ लाख मतदार कुणबी समाजाचे आहेत. मुंबईचे दोन, ठाण्यातील दोन, पालघरचा एक , कोकणातील ३ अशा आठ मतदारसंघात याच समाजाचे संख्याबळ मोठे आहे. महाराष्टÑात या समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांच्या आसपास आहे. हे लक्षात घेऊन या समाजाचा मान सर्वच राजकीय पक्षांनी राखावा अशी माझी व समाजाची इच्छा आहे.



मोदी लाट असतानाही कुणबी सेनेनी तील लाख मते मिळवली
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींची प्रचंड लाट होती. तरीही मी व माझ्या कुणबी सेनेने ३ लाख मते मिळविली होती. असे असतांना काँग्रेस मला या लोकसभा निवडणुकीत तिकिट कसे नाकारू शकते? असा सवाल कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी लोकमतशी बोलतांना उपस्थित केला.त्यांनी सोमवारी शहापूर येथे झालेल्या मेळाव्यात काँग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिल्याचे वृत्त मंगळवारच्या अंकात लोकमतने ठळकपणे प्रसिद्ध करताच काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दूरध्वनी करून त्यांना शांत करण्याचा व पक्षातच राहण्याचा आग्रह केला.

Web Title: Does Modi get 3 lakh votes in ticket? Assurances of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.