अनिरुद्ध पाटील
बोर्डी : आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढवता येते, हा आदर्श तारा मोहन चौधरी यांनी घालून दिला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक महिला शेतकरी एकात्मिक शेती पद्धती करत आहेत. या कार्याबद्दल शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांनी तारा चौधरी यांना आदर्श महिला शेतकरी म्हणून गौरविण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील किन्हवली या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला तारा चौधरी यांचे जेमतेम ७ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोहन चौधरींशी विवाहबद्ध झाल्यानंतर घर, संसार आणि शेतीकाम यातच दिवस जायचा. डोंगर-उतारावर ६ एकर शेती, पारंपरिक पद्धतीने भातशेती, त्यातून मिळणारे अत्यल्प उत्पन्न, घर चालवण्यासाठी अपुरे होते. त्यानंतर पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करावी असे ठरवले. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये भाताच्या कर्जत-३, कर्जत-७ या सुधारित जातींचा वापर केला. डोंगर उतारावर केशर जातीच्या आंब्याची, वेंगुर्ला-४, ६ या काजूची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. ५ गुंठा क्षेत्रात मोगरा लागवड केली. भातशेतीनंतर वांगी, मिरची, टोमॅटो आणि वेलवर्गीय भाजीपाला घेऊ लागले.
उत्पादन खर्च वगळून भाजीपाला आणि मोगरा पिकातून महिन्याला १५,५००/-, शेळीपालन व्यवसायातून प्रतिमहा १३,०००/- रुपये, मत्स्य व्यवसायातून वर्षाकाठी रु. ८८,०००/-, फळझाडातून रुपये १,००,०००/- मिळू लागले. आलेल्या उत्पन्नातून स्थानिक तसेच सुधारित जातींच्या गाई, शेती अवजारे खरेदी केल्या. त्यातून थोडे पैसे मिळू लागले. शेणाच्या वापरासाठी घरी बायोगॅस घेतला. इंधन खर्चात बचत झाली. श्रम कमी होण्यास मदत झाली. दरम्यान, मुलांना चांगले शिक्षण देता आले. मुलगा सर्जन झाला. मुलगी पदवीधर झाली. पूर्वी शेतीतून घरी खाण्यापुरते भात पिकत होते. मोलमजुरी आणि नवरा रिक्षा चालवत होता, त्यातून रुपये ३२,८००/- एवढे वार्षिक उत्पन्न होते, आता कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे एकात्मिक शेतीतून वार्षिक उत्पन्न रुपये ५,३०,०००/- मिळू लागले आहे.
पूरक व्यवसायांची जोडबदलत्या हवामानात फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेळीपालनसारखा पूरक व्यवसाय चालू केला. ६० स्थानिक जातीच्या शेळ्यांची जोपासना केली. त्यासाठी लसीकरण, त्यांचे खाद्य व्यवस्थापन, इत्यादीचे प्रशिक्षण घेतले. चारा पिकासाठी फुले जयवंत, को-४ या सुधारित जातीचे ठोंब लावून लागवड केल्याने मुबलक हिरवा चारा मिळू लागला. शेतामध्ये शेततळे बांधले. अशा प्रकारे आदर्श असे एकात्मिक शेतीचे मॉडेल उभारल्याने वर्षभर रोजगार मिळाला.