पालघर : आपल्या गावासमोरील समुद्रात मांडणी पद्धतीने मांडलेल्या जाळ्यात अडकलेल्या ‘फिनलेस पोरपॉइज डॉल्फीन’ला पुन्हा सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात महेश तामोरे या घिवलीच्या मच्छिमाराला यश आले.तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ असलेल्या घिवली गावातील मच्छिमार महेश तामोरे सकाळी उधानाच्या प्रवाहाने समुद्रातून येणाऱ्या माश्यांच्या थव्यांना पकडण्यासाठी अर्धवतुर्ळाकार मांडणीचे जाळे समुद्रात लावले होते. दुपारी या जाळ्यात अडकलेले मासे पकडण्यासाठी तामोरे गेले असताना एक मोठा मासा आपण लावलेल्या जाळ्यात सापडून सुटकेसाठी फिरत असल्याचे पाहून त्याला आनंद झाला.पाण्यातील हालचालींचा वेध घेत त्यांनी पाण्यात हात घालून पकडल्यानंतर हा मासा डॉल्फीन असल्याचे पाहून तो नाउमेद झाला. कारण उत्पनाच्या दृष्टीने या माश्याचा काहीही उपयोग मच्छीमारांना नसला तरी डॉल्फीन माश्याकडे कोळीबांधवांचा एक मित्र म्हणून पाहिले जाते. म्हणून त्याने माश्याला अलगदपणे उचलून पुन्हा समुद्रात सोडून दिले.फिनलेस पोरपॉइज (पाठीवर पर नसलेला) डॉल्फीन म्हणून हा मासा युरोप, कोरियन पॅनासुला (पूर्व चायना) आदी भागातून जगभराचा प्रवास करून अरबी समुद्रात येत असतात. या माशांचे वजन ३२ किलोपर्यंत असते. या माश्याच्या मादीचा गर्भधारणा कालावधी १० महिन्यांचा असतो. याचे अन्न असलेले लहान खेकडे, कोलंबी, लहान मासे इथल्या भागात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने या माश्यांचे वास्तव्य नेहमीच दिसत असल्याचे प्रा.भूषण भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जाळ्यातील डॉल्फीनला जीवनदान, पुन्हा समुद्रात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:11 AM