नालासोपारा : येथील रेश्मा नामक नवविवाहित शिक्षिकेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. १७ मे रोजी तिने गळफास घेऊन जीवन संपवले होते. सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ करून रेश्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शनिवार, २५ मे रोजी नालासोपारा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार तिचा पती व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईतील वाकोला परिसरात राहणाऱ्या राजबहादूर रामजतीन सिंह (६५) यांची मुलगी रेश्मा (२९) हिचा नालासोपारा येथील सुशील सिंग याच्यासोबत विवाह झाला होता. ते नालासोपाºयातील श्रीप्रस्थ परिसरात राहण्यास होते. रेश्मा ही पेशाने शिक्षिका होती.लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी तिच्याकडे हुंड्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. ३ फेब्रुवारी २०१८ ते १७ मे २०१९ यादरम्यान पती व तिच्या सासरच्या मंडळींनी वेळोवेळी माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे रेश्मा हिने १७ मे रोजी ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.नालासोपारा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांनी याबाबत सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरा सुशील, सासू ऊर्मिला, सासरे जितेंद्र बहादूर सिंग, दीर आतिषकुमार आणि नणंद सोनू सिंग यांच्या विरोधात रेश्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
हुंड्याचा तगादा लावल्यानेच नवविवाहितेने केली आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 5:52 AM