विरार : तालूक्याच्या ग्रामीण भागात काही विहीरी, तलाव आणि बोअरवेलमधून प्रचंड प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने आजूबाजूच्या विहीरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. आणखीन काही दिवस हा उपसा सुरु राहील्यास ग्रामीण भागात पाणी प्रश्न बिकट होऊ शकतो. हा पाणी उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विरार पूर्वेकडील भाटपाडा, शिरगाव, राईपाडा, कणेर, शिरसाड, भाताने,जांभूलपाडा, तळ्याचापाडा, कोशिंबे तर पश्चिमेकडील आगाशी, चाळपेठ, पुरापाडा आदी गावातील टँकरच्या सहाय्याने पाणी उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खालावलीआहे. त्यामुळे विहीरी व बोअरवेलला लावलेले पंप पाणी खेचू शकत नाही अशी स्थिती आहे. पाणीटंचाईच्या काळात टँकरला प्रचंड मागणी असल्याने पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी टँकरमाफिया पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत. तलावातून हा उपसा करून ते पाणी टँकरद्वारे विकले जात आहे. या वाहतुकीवर कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. दररोज होणाऱ्या बेसुमार उपशामुळे जमिनीची पाण्याची पातळी झपाटयÞाने खालावत असल्याने त्याचा थेट फटका आदिवासीपाड्यांनाही बसत आहे. (वार्ताहर)
बेसुमार उपशाने विहिरी, तलावांची पातळी घटली!
By admin | Published: May 07, 2016 12:46 AM