वाडा : भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक रस्त्यावरच गाड्या अस्ताव्यस्त लावत असल्याने व विशेषत: शुक्र वारी आठवडा बाजाराच्या दिवशी हे होत असल्याने येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. इतर वेळी हा रस्ता पार करायला पाच मिनिटांचाही कालावधी लागत नाही, मात्र आठवडे बाजाराच्या दिवशी जवळपास अर्धा-पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
कुडूस ही तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून मध्यवर्ती केंद्र आहे. आजूबाजूच्या परिसरातील ५२ गावांची ही मुख्य बाजारपेठ आहे. तसेच उद्योगधंद्यासाठी आलेले परप्रांतीय कामगार या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून ते बाजारहाट करण्यासाठी येथे येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे आठवडा बाजार भरत असून या बाजारात खरेदी करण्यासाठी हजारो ग्राहक येत असतात.
बाजारहाट करण्यासाठी आलेले ग्राहक आपली दुचाकी, चारचाकी अशी वाहने ही नाक्यावरच अस्ताव्यस्त लावून बाजारात खरेदी करण्यासाठी जात असतात. त्यामुळे कुडूस नाका येथे शुक्र वारची वाहतूक कोंडी ही नेहमीची होऊन बसली आहे. नेहमीच्या कोंडीने नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे एरव्ही नाका पार करायला पाच मिनिटेही लागत नसताना कोंडीच्या काळात अर्धा तास लागत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.