विरार : वसई पश्चिम येथे कार आणि दोन दुचाकींमध्ये भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बंगली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकाविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
वसईच्या बाभोळा ते कार्डिनल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी भरधाव वेगाने येणाºया कारने एका दुचाकी चालकाला धडक दिली. त्यानंतर या दुचाकीमागे असणाºया दुसºया दुचाकीलाही जोरदार धडक दिली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी असलेला पहिला दुचाकीचालक मनीष जयवंतराव पाटील (३९) हा पेशाने शिक्षक असून तारापूर विद्या मंदिर बोईसर या शाळेत शिकवतो. मनीष हा बंगली हॉस्पिटलला नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्यांना भेटून परतत असताना हा भीषण अपघात घडला.
बेदरकार कारचालकाला अटक
दुसºया दुचाकीवर असलेल्या दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये मेघना रावल यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. तर दुसºया रामना सिंग यांना कपाळावर मोठी जखम झाली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची तपासणी केली. अपघाताला जबाबदार असलेल्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे.