मीरारोड - मीरारोड मधील शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकास ठाणे न्यायालयाने ५ वर्षांचा कारावास तर गुन्हा घडताना पाहून देखील गप्प बसलेल्या बस केअर टेकर महिलेला ८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मीरारोडच्या शीतल नगर भागात हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट शाळा असून पीडित मुलगी ही त्या शाळेत शिकत होती. १३ डिसेम्बर २०१९ रोजी शाळेतून सुटल्यावर सुमारे ७ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही घरी जाण्यासाठी शाळेच्या बसमध्ये जाऊन बसली. त्यावेळी बसचा चालक डेनिस थॉमस लुईस ( ६३ ) रा. रामदेव पार्क, मीरारोड ह्याने मुलीचे कपडे काढून लैंगिक शोषण केले. बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता.
या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा बलात्कार , पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन डेनिस ह्याला १४ डिसेम्बर तर जेनेविया हिला २१ डिसेम्बर २०१९ रोजी पोलिसांनी अटक केली होती. अटक झाल्या पासून डेनिस हा जेल मध्येच आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपासिक अधिकारी कैलास बर्वे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करत आवश्यक ते पुरावे गोळा केले होते.
बुधवार २८ जानेवारी २०२४ रोजी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस. देशमुख यांनी आरोपी डेनिस ह्याला दोषी ठरवुन ५ वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. तर जेनेविया मथाईस हिला ८ महिने साधा कारावास व ५००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
केसचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी केला असुन सदर केसच्या सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता संध्या म्हात्रे व विवेक कडु यांनी कामकाज पाहिले. उपनिरीक्षक काकडे यांनी पैरवी केली. तर नया नगर पोलीस ठाण्याचे विद्यमान वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांनी मार्गदर्शन केले.