रविंद्र साळवे मोखाडा : धामनशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाटील पाडा, ठाकूरवाडी, धामनशेत या गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचे चटके लागत असताना टँकरची मागणी करून ही अजून पर्यत टँकरने पाणी पुरवठा केला गेलेला नाही यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी बांधव वणवण भटकंती करावी लागत आहे.येथील गावपाड्यांची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे. गेल्या काही दिवसापासून येथील विहिरींनी तळ गाठल्याने माती मिश्रीत गढूळ पाणी प्यावे लागत आसल्याने धामनशेतकर वाशीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.येथील मुख्य व्यवसाय हा शेती व निगडीत उद्योग असल्याने हा महिना शेतीची मशागत व राबणीचा असल्याने एकीकडे पाणीबाणी तर दुसरीकडे शेती अशी शेतकºयांची द्विधा मनस्थीती झाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नायब तहसीलदार पी. जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता धामणशेत येथील प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठवला असून मंजुरी मिळताच टँकर सुरू केले जाईल अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. दरम्यान, मंजुरीच्या लालफितीचा फटका जनता सोसत आहे हेच खरे!तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. जसा जसा सूर्याचा पारा वाढत आहे, तस तशी पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये भर पडत आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावपाड्यांची संख्या ६० वर पोहचली असून १९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामधील धामणशेत येथील प्रस्ताव पडून आहे जिल्हास्तरावर मंजूरीसाठी पाठवला असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले असले तरी गेल्या ४ ते ५ दिवस सलग सुट्या आल्याने आणखी कीती दिवस टँकरची प्रतिक्षा पहावी लागणार असा प्रश्न जनता विचारत आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यात त्वरित टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीदारांना दिले जातात परंतु या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
धामणशेतवासीयांच्या घशाला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:46 AM