पारोळ : वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत. या पार्श्वभूमीवर वसई परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने या भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याच पाहायला मिळत आहे.तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भातशेती व पावसाळी भाजीपाल्यांची शेती केली जाते. या वर्षाचा विचार केला तर अवकाळी पडलेल्या पावसाने या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही त्यांनी महागडी भातबियाणे खरेदी करून पेरणी केली, पण सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. पण, १५ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने भातपिके करपून गेली आहेत. तसेच पावसाळ्यात भातशेतीला जोड असणाऱ्या भाजीपाल्याची रोपेही करपून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पाऊस लांबल्याने हळवे, निमगरवे पिकांच्या भातलावणीचा हंगामही निघून जात असल्यामुळे या भागातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वसई तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने कोणतीही पाहणी केली नसून शेतकऱ्यांच्या मतांचा जोगवा मागणारी राजकीय मंडळीही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण, अशी व्यथा शेतकरी प्रसाद पाटील यांनी लोकमतकडे मांडली. (वार्ताहर)
वसई तालुक्यात दुष्काळी स्थिती
By admin | Published: July 10, 2015 10:23 PM