जव्हार : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये व्यसनाधिनता वाढल्याने अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या विक्रीला आळा बसावा म्हणून ढाढरी (जांभूळमाथा) ग्रामपंचायत हद्दीतील रणरागिनींनी या विरोधात आवाज उठवला असून तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करुन त्याची प्रत जव्हारचे पोलीस निरिक्षक घनश्याम आढाव यांना दिली आहे.दादरानगर हवेली या केंद्रशासित प्रदेशला लागून असलेली जव्हार तालुक्यातील ढाढरी ( जांभूळमाथा) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शंभर टक्के आदिवासी समाज वास्तव्यास आहे. येथे सिमेवरुन राजरोसपणे दमण दारुची विक्री होते. तसेच अनेक ठिकाणी बंदी असल्या गुळा द्वारे दारु गाळली जाते. परिणामी व्यसनाधिनता वाढत आहे. यामुळे अनेक नवरा-बायकोचे वाद होऊन त्यांचे संसार रस्त्यावर आल्याची अनेक उदाहरणे असल्याचे सरपंच सावित्री भोरे यांनी लोकमतला सांगितले.या गावची लोकसंख्या २,३५० येवढी असून दारुमुळे अनेकांच्या घरी रोजच्या अन्नाची सोय ही नसते. त्यातून कुपोषण वाढत आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने यात लक्ष घातल्यास या भागात पुर्णपणे दारु बंदी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.या विरोधात गावत दारूबंदीची दवंडी आली आहे. तसेच येथील महिलांनी जव्हार पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांची प्रत्येक भेट घेवून दारूबंदीचा ठरावाची प्रत त्यांना देऊन दारुबंदीच्या मोहीमेसाठी साकडे घातले आहे.यावेळी निवेदन देतांना सभापती अर्चना भोरे, सरपंच सावित्री सुभाष भोरे, ग्रामसेवक दत्तात्रेय गवाने, महिला वर्ग यांनी निवेदन दिले आहे.
ढाढरी गावात दारुबंदीचा ठराव, महिला शक्ती एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:14 AM