- जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील दहागाव येथे लघूपाटबंधारे उपविभागामार्फत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नसल्याने विहिरींना पाणी नसल्याचे दिसते आहे. तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त १९६ गावपाड्यांना ३२ टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी अजूनही २० ते २५ गावपाडे टँकरने पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली आहे. या टंचाईग्रस्त गावांपैकी एक म्हणजे दहागाव.ठाणे जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत लघू पाटबंधारे उपविभाग शहापूर यांच्या वार्षिक योजनेअंतर्गत दहागाव येथे ९.२५ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाजवळच गावातील विहिरी आहेत. बंधाºयात साठणाºया पाण्यात त्या विहिरींमध्ये पाणी राहील, आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, या परिसरात ओहोळाच्या आजूबाजूला शेतकरी भाजीपाला, पीके घेत असल्याने आज या बंधाºयात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे विहिरींमध्येही पाणीच राहिलेले नाही. यातच पाऊस लांबल्यास गावातील पाणी टंचाई मोठे रूप धारण करणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात.यापूर्वी कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याचे परिणाम जसे इतर गावांना सहन करावे लागत आहेत, तसेच ते दहागावला देखील भोगावे लागत आहेत. भूजल पातळी कमालीची खालावल्याने ज्या विहिरी, तलाव कधीही आटले नव्हते, त्यातही आज थेंबभर पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.या गावाला नळाद्वारे दोन दिवसांनी पुरवठा होतो मात्र तो अपुरा असल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. दहागाव पाड्यातील लोकांना एक किलोमीटरवरून पाणी आणावे लागते.
दहागावमधील बंधारा कोरडा, विहिरींनी गाठला तळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 1:22 AM