- हितेंन नाईक
पालघर : राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक भागातील पीक उत्पादनावर परिणाम झाला असून शेवटच्या दोन मिहन्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकर्यावर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याचे शासनाने सॅटेलाइट सर्वेक्षणाद्वारे जाहीर केल्यानंतर समितीद्वारे पहाणीला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात पावसाच्या अभावी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली असून नवीन निकषांच्या आधारे दुष्काळाची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धतीत बदल करून पेरणी, पाऊस, भूजल पातळी,उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यापैकी १७२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरील तीनही तालुक्यात आॅगस्ट महिन्यात पडलेला पाऊस चार वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर येऊन तो सप्टेंबर महिन्यात चार वर्षाच्या तुलनेत अवघा १० टक्के पडल्याने शेतकºयांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अगदी वाडा सारख्या भातशेतीला पूरक आणि वाडा कोलम सारख्या भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी पावसाने पाठ फिरविल्याने करपलेल्या शेतीला आगी लावून संताप व्यक्त करीत आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून पिकविलेले पीक करपून गेल्याने शेतकºयांनी ते पेटवून देण्याचे प्रकार वाढत चालले असून शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक वाढू लागला आहे. वाडा तालुक्यातील अनेक शेतकरी भातशेती करपून गेल्यानंतरही तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने संताप व्यक्त करीत आहेत.
पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच शेतकºयावर अन्याय होत असतांना त्यांचे अश्रू पुसायला त्यांचे हात मात्र थिटे पडले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार ट्रिगर २ नुसार पालघर, विक्रमगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित झाले आहेत. या तीन तालुक्यात प्रत्येकी १० टक्के गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आली आहेत. यात पालघर २२, तलासरी ५ आणि विक्रमगड ९ अशी ३६ गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयाचे मंडळ अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांची एक समिती नेमण्यात आली असून निवडलेल्या १० टक्के गावांची पाहणी करतांना सॅटेलाइट वरून आलेल्या माहितीची शहानिशा करण्याच्या कामाला सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून जमिनीचा ओलावा, पिकांची स्थिती आदी बाबींची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला सांगितले.