वाडा : बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान या तालुक्याला लाभले असले तरी नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या २४ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टँकरची मागणी वाढत आहे.
वाडा तालुक्यात १६८ खेडी व २५० पाडे आहेत. तर ८४ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकरण झाल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र त्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्यात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये बनविणाºया कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे ही पाणी कमी पडते म्हणून खासगी कूपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे भूजलाच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे. सरकारच्या धोरणानुसार कूपनलिका ही २०० फुटांपर्यत खोदली जाते. मात्र २०० फुटांवर पाणी लागत नसल्याने त्यापेक्षा कमी उंचीवर खोदलेल्या कूपनलिका ड्राय होतात. त्यामुळे सरकारने ही मर्यादा बदलून ३०० फुटांपर्यत करावी, अशी मागणी नागरिक करीत. वाडा तालुक्यात तुसे ग्रामपंचायत फणसपाडा, तरसेपाडा ओगदा ग्रामपंचायत सागमाळ, टोकरेपाडा, दिवेपाडा, जांभुळपाडा उज्जैनी, साखरशेत, आंबेवाडी, उज्जैनी गावठण, वरसाळे, वांगडपाडा कुयलू, भुरकुटपाडा, धिंडेपाडा, रोजपाडा, कातकरी वाडी, कुयलू गाव तोरणे ग्रामपंचायत तोरणे, चेंदवली, बेलसावर, पाचघर ग्रामपंचायत तिळमाळ, सुतकपाडा, गावीतपाडा, शेरूचापाडा, उंबरदयाचा पाडा, विºहे या २४ गावपाड्यात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जाचक अट रद्द करादीड किमी अंतरापर्यत पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा नियम आहे. या नियमामुळे अनेक गाव पाड्यात टंचाई असतांना सुद्धा शासन टॅकरने पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे हा नियम रद्द करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सध्या वाडा तालुक्यात २४ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही मागणी वाढत असून टंचाई गावाला तत्काळ टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. - प्रमोद भोईर, शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग