पालघर: मागील तीन ते चार वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी पुरवठा निरीक्षक सरळसेवेने भरली जात असल्याच्या निषेधार्थ पुरवठा विभागातील कर्मचारी ह्या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर गरिबांच्या घरातील चूल मात्र थंड पडणार आहे.भारतीय अन्न महामंडळाची बोरिवली आणि भिवंडी येथे दोन गुदामे असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील आठ तालुक्यात धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात मंजूर रास्तभाव धान्य दुकाने पालघर मध्ये (२१८), तर कार्यरत रास्तभाव धान्य दुकानांची संख्या (१४४) इतकी आहे. डहाणूमध्ये अनुक्र मे २०७ आणि १५९, वसई मध्ये १७९ आणि १४८, तलासरी मध्ये ६९ आणि ६२, वाडा मध्ये १५७ आणि १३६, जव्हार मध्ये ९९ आणि ८०, मोखाडामध्ये ६५ आणि ५६, विक्र मगड मध्ये ९२ आणि ८१ अशी एकूण १०८६ व ८६६ रास्तभाव दुकाने आहेत. जिल्ह्यात अंत्योदय योजने अंतर्गत ९७ हजार ८५ कुटुंबे शिधापत्रिका धारक (रेशन कार्ड धारक) असून त्यांना तांदूळ २३ हजार ९०९ क्विंटल तर गहू ९ हजार ५९० क्विंटल धान्याचे वाटप होते.तर १४ लाख २३ हजार ५३६ प्राधान्य कुटुंबिय शिधापत्रिकाधारक असून त्यांना तांदूळ ४२ हजार ७०६ क्विंटल, गहू २८ हजार ४७० क्विंटल धान्याचे वाटप केले जाते.सरळ सेवेच्या उमेदवारांची भरती झाल्या नंतर महसूल विभागाची पदे प्रस्थापित करण्यात यावेत असेही निर्देशीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील महसूल कर्मचाºयांनी सन २००८ मध्ये ४ ते ५ दिवस कामबंद आंदोलन केले होते. त्यावर पुरवठा विभागाच्या निर्देशकाना तत्कालीन महसूलमंत्र्यांनी निर्देश देवून पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील स्वतंत्र पदे भरती करू नये असे निर्देश दिले होते. स्वतंत्र पुरवठा विभागाची आस्थापना करून भरती केल्यास कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पित होऊन बरेच पदावनत व अतिरिक्त ठरून नोकरीपासून वंचित राहतील. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सरळ भरतीविरोधात कामबंद, ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट, सेवाज्येष्ठतेनुसार हवी संधी : पुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:41 AM