शशी करपेवसई : विरार येथील विकास झा आत्महत्येप्रकरणी अखेर बुधवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलीस निरीक्षकावर कोणतीच कारवाई न करता त्यांची बुधवारी रात्री विरार पोलीस ठाण्यातून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.१२ जानेवारीला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी पोलीस अधिक्षकांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याच दिवशी वाडा येथील कृपाल पाटील (२८) याने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधी दैनिक लोकमतने १३ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त दिले होते. त्यात विरार येथील विकास झा (२३) या तरुणाने आत्महत्या केली असतांनाही कोणतीच कारवाई केली नसल्याची बाब चव्हाट्यावर आणली होती. त्याची दखल घेत पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या आदेशानुसार बुधवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात मुनाफ बलोच या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुुन्हा नोंदवण्यात आला. झा याने आत्महत्येपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हीडीओ क्लिप व्हायरल केली होती. त्यात विरार पोलीस निरीक्षक युनुस शेख आणि मुनाफ बलोच यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विकासने १० नोव्हेंबर २०१७ रोजी संध्याकाळी सात वाजता वसई डीवायएसपी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या केली होती.लोकमततधील वृत्तानंतर अधीक्षकांना आली जागविकासची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, असा बचाव करीत पोलिसांनी दोन महिने कोणतीही कारवाई केली नव्हती. याचे वृत्त लोकमतने १३ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होेते. त्याची दखल घेऊन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बलोच याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी पोलीस निरीक्षक युनूस शेख यांचे नाव घेतले गेले असतांनाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांची फक्त विरारहूून उचलबांगडी केली आहे.
विकास झा आत्महत्येप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:08 AM