डहाणू : एका बाजूला हजारो मेगावॅट वीजनिर्मिती करणारे तारापूर अणुशक्ती केंद्र तर दुसऱ्या बाजूला उभे असलेले थर्मल पॉवर स्टेशन असे दोन महत्त्वाकांक्षी वीज प्रकल्प असतानादेखील डहाणूच्या पंचक्रोशीतील गावांत नेहमीच अंधाराचे साम्राज्य असल्याने घरोघरी चालणारा डायमेकिंगसारखा व्यवसाय मरणपंथाला लागला असून भूमिपुत्रांना अन्य क्षेत्रांत रोजगार शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये वीज महावितरणबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली असून येथील हजारो नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत दिवसातून अनेक वेळा तर बोईसर येथून येणाऱ्या १३२, १३३ केव्हीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने येथील तीस ते चाळीस गावांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. परिणामी, विजेवर अवलंबून असलेल्या डायमेकर्स, लघुउद्योजक, शेतकरी, बागायतदार तसेच लहानमोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. सकाळ झाल्यापासून विजेचा लपंडाव त्यातच दररोज तीनचार तासांच्या भारनियमनामुळे नागरिक वैतागले आहेत. याबाबत, सातत्याने ग्रामपंचायत, जि.प. सदस्य तक्रारी करीत असतानादेखील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बोईसर, पालघर, वसई येथील अधिकारी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील तीस ते चाळीस गावांत तसेच खेड्यापाड्यांत वीज महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो लोखंडी खांब जीर्ण व जुनाट झालेले आहे. ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असून अनेक ठिकाणी कमकुवत झालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्याची गरज असताना गेल्या अनेक वर्षांत ते बदललेले नाहीत. दिवसरात्र फ्युज, डीओ, झम्पर इ. उडण्याचे प्रकार घडत असतात. वीजपुरवठा खंडित झाल्यावर स्थानिक नागरिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करतात, परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणीही येत नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून फ्युज, डीओ टाकून वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो. (वार्ताहर)
इमर्जन्सी भारनियमनामुळे डायमेकिंग व्यवसाय मरणपंथाला
By admin | Published: October 10, 2015 11:23 PM