वाडा:दि.१३- वाडा शहरात प्रवेश करताच घाण व उग्र वास घेऊन आपले स्वागत करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उभे असून आता तर ही घाण महामार्गावर आल्याने वाहनचालकांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे.असे असले तरी, ग्रामपंचायत मात्र हे डम्पिंग ग्राउंड निर्मनुष्य स्थळी हलवायला तयार नसल्याने जनतेने याबाबत संताप व्यक्त केला आहे. कुठल्याही शहराच्या स्वागतासाठी सुंदर कमान, गार्डन अथवा एखादी ठळक गोष्ट असते. ज्यावर त्या शहराची ओळख, सौंदर्य व प्रतिष्ठा व्यक्त होते मात्र वाडा शहराच्या स्वागताला असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडमुळे या शहराला लाजेने मान खाली घालावी, अशी परिस्थिती आहे. वाडा शहरातील घनकचरा टाकण्यासाठी वाडा ग्रामपंचायतीकडे कुठलीही जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत हा घनकचरा वाडा भिवंडी महामार्गावर गांधरे गावाजवळ भर रस्त्याकडेला टाकला जातो, ज्याचा उग्र वास व कुजलेल्या अन्न धान्यावर सतत वळवळ करणाऱ्या प्राण्यांचा येथून येजा करणाऱ्या लोकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.आतातर हा कचरा महामार्गावर आल्याने महामार्गाची एक बाजू जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्याचा त्रास लोकांना व वाहनचालकांना नाहक सहन करावा लागत असून याकडे ना ग्रामपंचायत लक्ष देते ना सुप्रीम कंपनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला याच गांभीर्य वाटते. (वार्ताहर)
वाड्यातील डम्पिंग ग्राउंड महामार्गावर!
By admin | Published: October 14, 2016 6:13 AM