सुरेश काटेतलासरी : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच तलासरी तालुक्याला लागून असलेल्या गुजरात राज्याने आपल्या सीमा बंद केल्या. गुजरातमधील भिलाड येथील तपासणी नाक्यावर गुजरात पोलीस तसेच आरोग्य पथकाने कडक नाकाबंदी करून महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करून तसा रिपोर्ट जवळ बाळगणे अनिर्वाय केले आहे.
गुजरात राज्याने आपल्या सीमा बंद केल्या असल्या तरी गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोणतीही पाबंदी नाही. महाराष्ट्रातील पोलीस तसेच आरोग्य विभागाने आपल्या सीमा बंद केल्या नसून कोणीही नागरिक बिनधास्त महाराष्ट्रात येऊ शकतो. जसे कोणीही यावे नि टिकली मारून जावे असाच प्रकार चालू आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या बलसाड जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने बलसाड जिल्हा प्रशासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आला.
आजच्या घडीला महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने कामगार गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी, सिल्व्हासा येथे कामाला जातात. या कामगारांच्या झुंडी सकाळी गुजरात राज्यात जातात तसेच संध्याकाळी गुजरात राज्यातून महाराष्ट्रात परत येतात. खासगी वाहनाने प्रमाणापेक्षा जास्त कामगार भरून ये-जा केली जात असते, पण यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. तलासरीत कोरोना रुग्ण वाढीचे हे एक मूळ कारण आहे, पण यंत्रणा केवळ दुकानदारांवर कारवाई करीत फिरत आहे.
महाराष्ट्राच्या हद्दीवर सीमा बंद करणे आणि आरोग्य विभागा-कडून प्रवाशांची तपासणी करणे याबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. - स्वाती घोंगडे, तहसीलदार, तलासरी