जव्हार : शासनाने नेमलेल्या महाराष्ट्र इ-टेंडर वेब साईटमध्ये नेहमी व्यत्यय अथवा एरर येत असल्याने जव्हारमध्ये निघालेल्या न्युक्लिअस बजेट व कौशल्य विकास योजनेचे ई-टेंडर भरण्यापासून ६ ते ७ पुरवठादारांना मुकावे लागलेले आहे. या सर्व पुरवठादारांनी ई-टेंडरची प्रथम प्रकिया म्हणजे टेंडर फॉर्म फी व अनामत रक्कम भरलेली असून लिफाफा क्र. १ भरलेला आहे, मात्र वेब साईट सतत बंद पडत असल्यामुळे लिफाफा क्र. २ काही पुरवठादारांना भरता आलेले नाही, त्यामुळे त्यांनी वेब साईट सतत बंद पडत असल्याच्या लेखी तक्रारी प्रकल्प अधिकारी, जव्हार यांना दिल्या व याची तक्रार वरीष्ठ कार्यालय अप्पर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांच्याकडेही केल्यात. इतक्या पुरवठादारांच्या तक्रारी असून सुध्दा जव्हार प्रकल्प कार्यालय कडून संपूर्ण निविदा प्रक्रियेस मुदत वाढ दिलेली नाही, जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत एकूण १९ निविदा काढल्या होत्या, परंतु त्याला प्रतिसाद नसल्याने १० निविदांची मुदत वाढ देण्यात आली, तसेच ६ निविदांना मोजक्याच म्हणजेच नियमानुसार तीनच निविदा प्राप्त झालेल्या आहेत, तसेच सात आठ पुरवठादारांच्या तक्रारी, याचाच अर्थ असा होतो की वेब साईटमध्ये व्यत्यय अथवा एअरर असल्यामुळेच पुरवठादारांना पूर्णपणे भाग घेता आलेला नाही. अशी माहीती पुरवठादारांनी दिली. जर उर्वरीत निविदांना मुदत वाढ दिली नाही तर यात कमी पुरवठादार भाग घेतील आणि यात शासनाचे नुकसान होणार असल्याचेही पुरवठादारांनी सांगितले. याप्रकरणी पुरवठादारांनी वरीष्ठ कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीअर्जावर तातडीने अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, ठाणे यांनी निविदा प्रक्रियेबाबत चौकशी करून मुदतवाढ देण्या बाबतचे पत्र पाठविले आहे. परंतु निविदेची द्वितीय मुदत वाढची प्रकिया संपुष्टात येत आहे, त्यामुळे जव्हार येथील स्थानिक पुरवठादारांनी न्याय मिळण्यासाठी प्रसिध्दी माध्यमांनकडे धाव घेत शासनाच्या भोंगळ कारभारा विरूध्द तक्रारी केल्या असून पूर्ण निविदा प्रकियेला मुदत वाढ मिळावी अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)शासनाच्या वेब साईट नेहमी बंद असते, सर्व्हिस अनअव्हेलेबल असा मेसेज येत असतो, त्यामुळे जव्हारसारख्या दुर्गम भागात आम्हाला याचा खूपच त्रास सहन करावा लागतो, आम्ही या निविदेत भाग घेतलेला आहे, परंतु अखेरच्या दिवसांत वेब साईट सतत बंद पडत असल्यामुळे आम्ही निविदा प्रक्रियेत भाग घेऊनही वंचित राहीलो आहोत. जर या निविदांची मुदत वाढ न मिळाल्यास आम्ही पुरवठादार कार्यालयासमोर उपोषण सुरू करू. - आसीफ मो. शफी मुजावर, जव्हार, पुरवठादार
ई-टेंडर ठप्प, निविदा रखडल्या
By admin | Published: November 17, 2015 12:06 AM