वसई : नोटाबंदी आणि चलन तुटवड्याला मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून केलेला रोकड रहित व्यवहार उत्तम पर्याय आहे. त्यामुळे काळा पैसा नष्ट होऊन ग्रामीण जनतेला रोकड उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी विरारमध्ये बोलताना केले. ‘सरकारचे कॅ शलेस धोरण आणि त्याचा वापर’ या विषयावर विरारमध्ये यंग स्टार्स ट्रस्ट आयोजीत व्याख्यानात बोलत होते. रोकडविरहित व्यवहार करण्यासाठी ई वॉलेट ही संकल्पना रूजू लागली आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले. ई वॉलेट म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, त्याचे फायदे तोटे, समज गैरसमज ठाकुर यांनी उलगडवून सांगितले. नोटाबंदीनंतर देशात मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वत्र रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. हे अत्यंत सोपे असून सर्वांनी ते शिकून घ्यायला हवे असे त्यांनी सांगितले. स्मार्ट फोन, सेव्हिंग अकांऊट आणि डेबिट कार्ड असेल तर तुम्ही मोबाईल वॉलेट सुरु करु शकता असे त्यांनी सांगितले. उदाहरणासाठी त्यांनी पेटीएम हे मोबाईल वॉलेट कसे डाऊनलोड करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा ते उपस्थितांना प्रात्यक्षिक आणि स्लाईड शोच्या आधारे करुन दाखवले. (प्रतिनिधी)
ई - वॉलेटमुळे काळा पैसा नष्ट होण्यास मदत
By admin | Published: December 22, 2016 5:29 AM