शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कवसई : गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने अर्नाळा समुद्रकिनारा उध्वस्त होऊन सुरुची अनेक झाडे वाहून गेली आहेत. धूपप्रतिबंधक बंधारा या किनाऱ्यावर नसल्याने हा अनर्थ घडतो आहे.उधाणाचे पाणी प्रचंड वेगाने थेट बागेत घुसते आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बेकायदा रेती उत्खननामुळे किनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. त्यातच पावसाळ्यात येणाऱ्या मोठ्या उधाणाच्या लाटांनी किनारा वाहून जाऊ लागला आहे. त्यामुळे आता अर्नाळा समुद्रकिनारी उरली सुरली सुरुंची बागही नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.गेल्या तीन दिवसात समुद्रात मोठे उधाण आले आहे. त्यामुळे समुद्र खवळून जवळपास आठ फूट उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांनी समुद्रकिनारा उध्वस्त करून थेट सुरुच्या बागेत प्रवेश केला होता. त्यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. लाटांच्या तडाख्याने समुद्रकिनाराच वाहून गेल्याने सुरुच्या बागेतील अनेक झाडे उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. काही झाडे तर मोठा वारा आला तरी उन्मळून पडतील इतकी धोकादायक बनली आहेत. त्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली अर्नाळा समुद्रकिनारची सुरुची बाग नष्ट होणार आहे.दरम्यान, यावेळच्या पावसाळ््यातील उधाणाच्या लाटांनी वसई तालुक्यातील अनेक गावांचा किनारा उध्वस्त केला आहे. त्याचबरोबर धूपप्रतिबंधक बंधारेअतिशय निष्कृष्ट बांधल्याने ते वाहून गेले आहेत.
अर्नाळ्यातील सुरुंची बाग धोक्यात
By admin | Published: June 30, 2017 2:35 AM