पालघर - डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ४३ वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटीच्या निधीची गरज असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन्ही तालुक्यातील २७ गावातील हजारो ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.१९७६ मध्ये कुर्झे धरण बांधण्यात आले असून या धरणात पाणी साठवण क्षमता ३९.५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सहा हजार एकरावरील या धरणावर २ हजार ५०८ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे. चार दशकांपूर्वी माती आणि तत्सम साहित्याचा वापर करून बांधण्यात आल्याने या धरणाचे बांधकाम काळानुरूप जीर्ण होऊन ते धोकादायक बनले आहे. दापचरीच्या दुग्ध प्रकल्पासाठी या धरणातील पाण्याचा वापर पूर्वी होत असल्याने या धरणाच्या दुरुस्तीसाठी दापचारी प्रकल्पाच्या बांधकाम विभागाने मुंबईच्या आरे विभागाकडे चार कोटींची मागणी करण्यात आली होती.या निधीतून मुख्य बंधाऱ्याच्या दुरुस्ती आणि मजबुती करणासाठी १ कोटी ८२ लाख रुपये तर धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन कक्ष स्थापन करणे, कायमस्वरूपी विद्युत पुरवठा उभारणे, सी.सी.टीव्ही कॅमेरे, जनरेटर, टेलिव्हिजन संच आदींसाठी २ कोटी ९ लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.या भागात नोव्हेंबर २०१८ पासून धक्के जाणवत असून या धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपसणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने धरणाचे स्थानिक धरण बांधकाम विभागाकडून निरीक्षण करण्यात आले असून धरणास भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी आपत्कालीन व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी प्रामुख्याने धरणाच्या पायथ्याशी दर २५ मीटर अंतरावर रिलीफ वेल बांधणे, टो ड्रेन, क्रॉस ड्रेन, अप स्ट्रीम, डाऊन स्ट्रीम विस्कळीत पिचिंग दुरुस्ती करणे, बिटूमन ग्राउंटिंग, केमिकल ग्राउंटिंग करणे आदी कामे करण्याची गरज या पत्रात नमूद करण्यात आली आहे.भूकंपाचा धक्का बसून मोठी गळती निर्माण झाल्यास डहाणू तालुक्यातील वरखंडा, दापचरी, ठाकर पाडा, वंकास, धामण गाव, कोमपाडा, आस्वाली, खुनवडे, बार्डी, जवलाई तर तलासरी तालुक्यातील नवापाडा, धोडीपाडा, सवणे, बोबी पाडा, ओझर पाडा (वडवली), फरल पाडा, कोळी पाडा, हाडळ पाडा, सोनार पाडा, झरी-करवंदी, झरी (वळवी पाडा), डोलार पाडा (गिरगाव), गिरगाव (नारायण ठाणा), गिरगाव (गोरखणपाडा), कोंब पाडा, ब्राम्हणपाडा, दिवरी पाडा व आरज पाडा या दोन्ही तालुक्यातील तब्बल २७ गाव-पाड्यातील हजारो आदीवासींच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सरकारचे दुर्लक्ष होत आहेजाहिराती पोटी कोट्यवधी रु पयांची उधळण करणारे भाजपाचे सरकार सर्वसामान्यांच्या जीविताला धोका पोहोचवणाºया कुर्झे धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यास मात्र काणाडोळा करीत असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केली आहे.
भूकंपामुळे कुर्झे धरणाच्या सर्व्हेची गरज, प्रशासन सुस्तच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:22 AM