पालघर - पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरू आहे. काल देखील सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून आज सकाळी पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. डहाणू, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के बसले असून ३.३ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाच्या हादऱ्याने भयभीत होऊन काही रहिवाशांनी घरेदेखील सोडली असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे बसले होते. यात एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे