नवी मुंबई - पालघर जिल्ह्याजवळ तलासरी, डहाणू तालुक्यापर्यंतच्या भागात भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्याची माहिती आहे. सकाळी-सकाळीच हा भूकंपाचा धक्का जाणवला असून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता किनारपट्टीवरील सातपाटी ते जव्हारपर्यंत पसरली आहे. साधारणत: 11.15 वाजण्याच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे असून वाढत्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.
पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी सकाळी जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता वाढली. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी असून सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी हा मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त क्षमतेचा हा धक्का असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. भूकंपाच्या धक्क्याची मोठी तीव्रता पाहता रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स जोरात हलल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच संबंधित परिसरातील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांना तडे गेलेत का ? याची तपासणी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रशानसनाकडून या भूकंपानंतर नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. जवळपास 10 किमी परिसरात हे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.