- सुरेश काटेतलासरी - भूकंपाचे धक्के बसत असलेल्या धुंदलवाडी गावातील धोकादायक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून रखडला आहे. सध्या या भागात सतत बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने ती अधिकच धोकादायक बनली आहे. या परिस्थितीमुळे शाळेत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिकत आहेत. भूकंपाचे धक्के बसत असल्याने विद्यार्थी वर्गात न बसता सामाजिक संस्थेने शाळेबाहेर बनवून दिलेल्या शेडमध्ये बसत आहेत.धुंदलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव २०१७ या वर्षी पाठविण्यात आला होता. मात्र, दोन वर्षे पाठपुरावा करुन सुद्धा तो मार्गी लागला नाही. अनेकदा अर्ज विनंत्या करुनही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अजून पर्यंत वेळ मिळालेला नाही.नादुरुस्त असलेली ही शाळा भूकंपाच्या धक्क्याने अधिकच धोकादायक बनली आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी भितीमुळे शाळेत येणे बंद केले आहे. भूकंपाचा धक्का बसताच मुले वर्गाबाहेर पळत सुटतात त्यामुळे शिक्षकांनी मुलांना वर्गात न बसविता उघड्यावर मंडपात बसवून शिकविणे सुरू केले आहे.शिक्षकांचा शाळा सुरु ठेवण्याचा हा प्रयत्न उपलब्ध अपुरी जागा व इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता तोकडा पडत आहे. त्यांना एका जागी एकत्र बसवणे अवघड जात आहे. मुलांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नसल्याने त्याची गुणवत्ता घसरू लागली आहे. भूकंपाच्या भीतीने पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे शाळेत मुलांची उपस्थिती कमी झाली आहे. २६० पटसंख्या असलेल्या शाळेत भूकंपाच्या भीतीने १५० चा उपस्थितीचा आकडाही पूर्ण होतांना दिसत नाही. उघड्यावरच्या शिक्षणामुळे त्याचे लक्ष उडाले आहे.धुंदलवाडी शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असून तीन वर्ग खोल्या पाडून नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. बांधकाम विभाग कार्यवाही करीत आहे.- विष्णू रावते,(प्रभारी गट शिक्षण अधिकारी, पं.स. डहाणू)
पालघरमध्ये शिक्षणाला भूकंपाचा ‘धक्का’, २६० चा पट १५० वर घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:01 AM