कासा : डहाणू तालुक्यात सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरण आणि कवडास बंधारा येत असून त्यापैकी कवडास बंधाऱ्यातून, कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र दुरवस्थेमुळे उजव्या कालव्यातून ठिकठिकाणी पाणीगळती होत असून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.
सारणी गावाजवळ उजव्या कालव्याच्या दुरवस्थेमुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे दिसते आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे कालव्याला या ठिकाणी मोठ्या चिरा (भेगा) गेल्या असून त्यातून गळती होणारे पाणी हे डहाणू- जव्हार या मार्गावर पसरलेले पाहावयास मिळते. डहाणू - जव्हार या मार्गावर प्रवास करणाºया अनेक बाईकस्वारांचे रस्त्यावरील या पाण्यामुळे अपघात झाले आहेत. तसेच उर्से, म्हसाड, साये, आंबिस्ते, आंबिवली आदी ठिकाणी कालव्यातून तसेच गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते. असे असले तरी पाटबंधारे विभागाचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.
आदिवासी भागातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने या कालव्याची निर्मिती केली. मुख्य कालवा ८० किमीचा असून त्याअंतर्गत इतर छोट्या कालव्याची लांबी तीनशे ते साडेतीनशे किमी असून त्यांच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा होतो. परंतु या कालव्याची दुरुस्ती न केल्याने व गाळ न काढल्याने त्यांचीअवस्था दयनीय झाली आहे. शेती सिंचनातून वर्षापोटी शासनाला लाखो रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असूनही या कालव्याची दुरुस्ती व गाळ काढण्यात का आला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
या कालव्याच्या दुरवस्थेबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागाला निवेदनही दिले आहे. परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या कालव्यांमधून होणाºया गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे पिकावर परिणाम होत असून पाण्याअभावी पिके करपतात. शेतकºयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.कालव्याची ठिकठिकाणी पडझड झाली असून त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. आम्ही याबाबत अनेकदा पाटबंधारे विभागाला कळविले आहे, परंतु याबाबत मात्र कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. - सुरेश जाधव, शेतकरी