लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मनपाचे माजी महापौर रूपेश जाधव यांच्यासहित चार जणांना तब्बल ७८० कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी बजावलेली 'कारणे दाखवा' नोटीस समाज माध्यमातून व्हायरल होत असल्याने वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते आणि खळबळ माजली होती.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार प्रितम म्हात्रे यांनी प्रवर्तन निदेशालय (ईडी) कार्यालयाला दिलेल्या तक्रारीनुसार मनपाचे माजी महापौर रूपेश जाधव व त्यांच्यासह मनोज चतुर्वेदी, गंंगाराम मुकुंद आणि अशोक गिध यांनी एकाच मालमत्तेवर/फ्लॅट अनेक रजिस्ट्री करत सुमारे ७८० कोटींचा कथित गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
तक्रारदार प्रितम म्हात्रे यांच्या या आरोेपातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी ‘ईडी’ कार्यालयाचे जॉईन्ट डायरेक्टर (इन्टेलिजन्स) यांनी २८ नोव्हेंबरला माजी महापौर रूपेश जाधव यांच्यासहित अन्य तिघांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या ५० च्या पोटकलम (२) आणि पोटकलम (३) अंतर्गत प्रत्येक कार्यवाही ही भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १९३ आणि कलम २२८ च्या अर्थाप्रमाणे न्यायालयीन कार्यवाही मानली जाईल. (१८६० च्या ४५) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजवाली आहे. या नोटिसच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत अंमलबजावणी संचालनालय, पहिला आणि दुसरा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, जवाहरलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश ‘इडी’ कार्यालयाने या नोटीसीत दिले आहेत.
दरम्यान; या नोटीसीतील तथ्यता तपासून पाहण्यासाठी माजी महापौर रुपेश जाधव यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी हो नोटीस खोटी असल्याचे सांगितले आहे. अशी कोणतीही नोटीस आपल्याला आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदर नोटीस ही राजकीयद्वेषाने समाज माध्यमातून प्रसारित केली आहे. माझे माझ्या प्रभागात उत्तम काम सुरू आहे. कदाचित कुणाला तरी ते खुपत असावे आणि त्यातूनच हा खोडसाळपणा केला असावा, असे रुपेश जाधव यांचे म्हणणे आहे.
नोटीसीत उल्लेख केलेला तक्रारदार हा आमच्या गावातील आहे. त्यांच्याबाबत माहिती घेतल्यास कुणीही चांगले बोलणार नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. नोटीस यावी इतके मोठे व्यवहार तालुक्यात कुणाचे नाहीत. तर माझे कसे असतील? मुळात ही नोटीसच खोटी आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे रुपेश जाधव यांनी सांगितले आहे.