अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी- पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली. ती ऑलिव्ह रिडले जातीची असून त्यांच्यावर पारनाका येथील कासव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत. सजग नागरिकांमुळे या जीवांना वाचविण्यात यश आले आहे.घोलवडच्या किनाऱ्यावर जाळ्यात जिवंत कासवं आढळल्याची माहिती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांना पालकांनी दिल्यानंतर त्यांनी कासव पुनर्वसन केंद्राला कळविले. या संस्थेचे प्रतीक वाहूरवाघ आणि रेमंड डिसोझा हे सदस्य खास कासवांकरिता बनविण्यात आलेल्या अॅम्ब्युलन्सने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मासेमारीच्या नॉयलान जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना बाहेर काढून केंद्रात भरती केले. चिखले, मरवाडा किनाऱ्यावरही दोन कासवं असल्याची माहिती संतोष वरथाय स्थानिकांनी दिल्यानंतर, टीमकडून रेक्यूचे काम सुरू असताना लगतच्या कांदळवनात भरत दुबळा या ग्रामस्थाला जाळ्यात अडकलेले कासव दिसले. या तिन्हीसह पारनाका किनाऱ्यावर आढळलेल्या अन्य एका कासवाला केंद्रात भरती करण्यात आले. तर शुक्रवारी चिंचणी किनाऱ्यावरून दोन कासवं रेस्क्यू केली होती. दरम्यान मागील एका महिन्याच्या कालावधीत एकूण पंचवीस जखमी कासवं आढळली असून त्यांच्या पंख, मान तसेच शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आहेत.हे देशातील पहिले तसेच एकमेव पुनर्वसन व उपचार केंद्र उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात चालविले जाते. मुंबईतील पशुवैद्य दिनेश विन्हेरकर येथे येऊन त्यांच्यावर उपचार करतात. त्यांची शुश्रूषा आणि आहाराचे काम या प्राणीमित्र संस्थेकडून पहिले जाते. तंदुरुस्त झालेल्या कासवांना समुद्रात सोडण्यापूर्वी त्याची संपूर्ण लिखित नोंद ठेवली जाते. मागील एका महिन्यात 25 कासवं केंद्रात दाखल केली, त्या पैकी दोन मृत होती. प्रतिवर्षी हा आकडा वाढता असल्याचे या पुनर्वसन केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे या सागरी जिवाच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
डहाणूच्या किनाऱ्यावर आढळली आठ जखमी कासवं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 3:41 PM