-आशिष राणे
वसई : वसई पूर्व वालीव कोविड सेंटर व इतर कोरोना उपचार आदींच्या नागरी प्रश्नांबाबत मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांची मंगळवारी भेट मागितली होती.
आयुक्तांनी मनसेला भेटीची अनुमती दिली मात्र केवळ दोन लोकांना अनुमती दिल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या अविनाश जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर अपमान झाल्याच्या रागातून अक्षरशः राडा घालीत पोस्टरबाजी केली.तसेच आयुक्त विरोधात घोषणाबाजी करीत प्रसंगी मराठमोळ्या गलिच्छ शिव्यांची लाखोली सुद्धा वाहिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडला आहे.
दरम्यान वसईत रूग्ण वाढत असताना मनसेने केलेल्या या धक्कादायक प्रकाराने काही काळ महापालिका मुख्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल का? अशी सुध्दा भीती कर्मचारी वर्गाला वाटू लागली होती एकूणच ही परिस्थिती तासभर निर्माण झाली होती.
मनसेचे पदाधिकारी शिवाजी सुळे यांनी सांगितल्या नुसार ,आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी लॉकडाऊन संदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलवली त्यावेळी सुध्दा मनसे ला दूर ठेवले तर दरवेळी शिवसेना व त्यांचे नेते असे आठ -आठ जण मोठया संख्येने आयुक्तांच्या दालनात भेटी घेऊन चर्चा करू शकतात हे आयुक्तांना चालते मग आम्ही चार जण कोरोना व नागरि समस्येवर उपाय करण्याच्या हेतून म्हणून चर्चा करणार असू तर त्यात गैर काय आहे ? असे मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दालनाबाहेरून आयुक्तांना प्रतिप्रश्न केला त्यावर आयुक्त अनुत्तरितच राहिले.
दरम्यान हा प्रकार तासभर दालनाबाहेर सुरूच होता त्यावेळी जिल्हाद्यक्ष अविनाश जाधव यांच्या समवेत मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील,जयेंद्र पाटील,शिवाजी सुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साथीनं हे धिक्कार आंदोलन करण्यात आले.याउलट आयुक्तांच्या विरोधात या सर्वांनी पोस्टर बाजी,घोषणाबाजी व खास करून मराठमोळ्या गलिच्छ शिव्यांची लाखोली सुध्दा वाहिली. विशेष म्हणजे या दालनाबाहेरच्या घडल्या प्रकाराचा व्हिडीओ देखील मनसेने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
परिणामी आयुक्तांच्या पोलिस अंगरक्षक व इतर सुरक्षा रक्षक यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना विनंती करून तेथून बाहेर जाण्यास सांगितले तरीही काही काळ या सर्वमध्ये आयुक्त भेटी वरून बाचाबाची सुरूच होती. या एकूणच महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांनी हा प्रकार सुरु असेपर्यंत चूप्पी साधली होती.
मनसे व त्याच्या पदाधिकाऱ्यांनी व खास करून अविनाश जाधव यांनी गैरवर्तन वजा शिव्यांची लाखोली वाहिली आहे याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करणार का ? यावर आयुक्तांनी मला नेमक्या मराठीतून कोण कोणत्या शिव्या दिल्या त्या समजल्या नाहीत मात्र मी तो व्हिडीओ पाहतो व चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे ही आयुक्तांनी लोकमत शी बोलताना स्पष्ट केलं.
शिवसेना आठ लोक घेऊन आयुक्तांकडे कधीच बसली नाही, तर खरोखरच मनसेच्या जाधव यांना हा कोविड सेंटर व इतर प्रश्न सोडवयाचे असते तर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असती. त्यामुळे हा निवळ बालिश पणा आहे, ही ती वेळ नाही. आणि शिवीगाळ करणं वगैरे गैर वर्तन आहे, केवळ अविनाश जाधव व मनसेनं हे प्रसिद्धीसाठी केलेलं कृत्य आहे.
निलेश तेंडुलकर शिवसेना,उपजिल्हाप्रमुख, पालघर जिल्हा