लाेकमत न्यूज नेटवर्क, पालघर: ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा पालघर जिल्ह्यातील प्रारंभ गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाला. मात्र कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दोघे शेजारी बसले असताना सुरुवातीला ९ मिनिटे ४५ सेकंद त्यांच्यात काही संवादच झाला नाही. शिवसेनेच्या जाहिरातीवरून युतीमध्ये उद्भवलेल्या वादानंतर शिंदे-फडणवीस काय बोलतात, याची प्रचंड उत्सुकता होती. सिडको मैदानावर आयोजित या सभेत दोघांनी एकमेकांची भरपूर प्रशंसा केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकाच हेलिकॉप्टरने उतरल्यावर शिंदे यांनी आपल्या गाडीत बसण्याची खूण फडणवीस यांना केल्यावर मी माझ्या गाडीत बसतो, असे सांगत उपमुख्यमंत्री आपल्या गाडीत बसले. कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर दोघे शेजारीच बसले होते; मात्र तब्बल ९ मिनिटे ४५ सेकंद दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. दोघेही अधूनमधून स्वत:चे मोबाइल पाहत होते. यादरम्यान त्यांचे प्रशासनाकडून स्वागतही झाले. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांना काहीतरी सांगितले व दोघांत संवाद सुरू झाला. कार्यक्रमाच्या शेवटी तीन योजनांचे आभासी उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रिमोट हातात घेताच उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांना साथ दिली.
सर्व आदिवासी बांधवांना घरकुल देणार : फडणवीस
- पालघर जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावा. ओबीसी घटकांनाही सरकार घर देणार आहे. मच्छीमारांचा चार वर्षांत थकलेला २५० कोटींचा डिझेल परतावा त्यांना तत्काळ मिळवून दिला असून, यापुढे परतावा थकणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
- पालघर जिल्ह्यात अनेक आव्हाने आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करून जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावतील, असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पोलिस अधीक्षकांनी सुरू केलेले जनसंवाद अभियान खूपच यशस्वी झाल्याचे चव्हाण म्हणाले.
- केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पनेतून लाभार्थींना थेट लाभ देण्याचे काम मागील नऊ वर्षांपासून सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकांसाठी काम करीत राज्याला नव्या उंचीवर नेण्याचे काम करीत असल्याचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले.
अनेकांकडे ॲॅण्ड्रॉइड फोन
मोबाइलचा टॉर्च चालू करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हजारो लाभार्थींकडे किमान एक ॲण्ड्रॉइड फोन असल्याची चर्चा कार्यक्रम ठिकाणी होत होती.
आसनव्यवस्था कमी; काहींना उष्माघाताचा त्रास
आसनव्यवस्था कमी पडल्याने कार्यक्रमाला उपस्थित शेकडो लोकांना उन्हातान्हात बसावे लागले. यावेळी काहींना उष्माघाताचा त्रास झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमस्थळी येण्यासाठी अडीच ते तीन तास आधीच रांगा
सकाळी ९:३० वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी यायला लागलेल्या लोकांच्या रांगा १२ वाजेपर्यंत सुरूच होत्या. अनेक महिला आपल्या मुलाबाळांसह आल्या होत्या. काहींना लाभ द्यायचा आहे, असे सांगून आणले होते, तर काहींना प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.