लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : नालासोपारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, कोरोनाची लस घेण्यापूर्वी नावनोंदणीसाठी रांगेत उभे असताना उन्हामुळे चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका डॉक्टरांनी दिली.
येथील पाटणकर पार्क प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ३ दिवसांपूर्वीच आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण, याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाटणकर पार्क परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपाने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यात कोरोनाची लस घेण्यासाठी हरीशभाई पांचाळ (६३) हे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या लसीकरण केंद्राची जागा अत्यंत लहान व लसीकरणासाठी पूरक नाही, त्यामुळे लसीकरणाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार परिवहन सदस्य बाबुसिंग पुरोहित यांनी आयुक्तांना १० मार्चला पत्राद्वारे केली होती. तसेच वयोवृद्धांना तासन् तास रांगेत उन्हात उभे राहावे लागते, त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था नसल्याचे तक्रार पत्रात नमूद आहे. या ठिकाणी किमान प्राथमिक सुविधा आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असती, तर पांचाळ यांचा जीव वाचला असता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले
लस घेण्यापूर्वीच आली चक्करहरीशभाई पांचाळ यांना मधुमेहाचा त्रास होता. नावनोंदणीसाठी होते रांगेत उभे होते. मात्र, कोरोनाची लस घेण्यापूर्वीच चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.- डॉ. सुरेखा वाळके, वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महानगरपालिका