हितेन नाईक
पालघर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने घाईघाईत उमेदवारी अर्जात कुठल्याही त्रुटी राहून कुणा उमेदवाराची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ नये यासाठी पालघर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांचे अर्ज तपासणीची यंत्रणा पालघर तहसीलदार कार्यालयात उभी केली आहे. या दिवशी उमेदवारी अर्ज मात्र स्वीकारले जाणार नाहीत.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५७ जिल्हा परिषद गटांसाठी तर ११४ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीची घोषणा १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी करून निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ उडवून टाकली. उमेदवार शोधण्यापासून ते त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र, शौचालय असल्याचा व त्याचा वापर करीत असल्याचा दाखला व ठराव प्रत, अपत्य असल्याचा दाखला, गुन्हेगारीसंदर्भातील माहिती, स्वयंघोषणा प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे व माहिती गोळा करावी लागते. यासाठी अवघ्या ५ दिवसांची मुदत देण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांची ससेहोलपट सुरू आहे. हे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने व त्याच्या सूचकांची सही उमेदवारी अर्जावर नसणे, अनेक माहितीच्या रकाण्यातील माहिती पूर्णपणे न भरणे आदी बाबी घाईघाईने राहून उमेदवारांची राजकीय कारकीर्द खराब होऊ नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी गजरे यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी पालघर तालुका जिल्हा परिषद गटातील एकूण १७ जागा व ३४ पंचायत समिती गणासाठी भरलेले उमेदवारी अर्ज प्राथमिक स्तरावर तपासून देण्याची व्यवस्था तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठी व गणासाठी एक अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली असून तहसीलदार शिंदे, पालघर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माळी आणि भूमिअभिलेख अधिकारी सातपुते हे सहाय्यक निवडणूक अधिकारी या कामावर देखरेख ठेवणार आहेत. रविवारी फक्त उमेदवारी अर्जाची तपासणी करून अर्जात त्रुटी असल्यास त्या उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. मात्र सोमवार (२३ डिसेंबर) रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असल्याने त्याच दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे गजरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वाड्यात बविआ व शिवसेनेचे दोन उमेदवारी अर्ज दाखलवाडा :वाडा येथील गालतरे गणात एक तर आबिटघर गणात एक उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल करण्यात आले. गालतरे गणातून बविआचे संतोष बुकले यांनी तर आबिटघर गणातून प्रविण विठ्ठल जाधव यांनी शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत.