डहाणू - तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या ६ ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुका रविवारी शांततेत पार पडल्या. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५२ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १६ उमेदवार बिनविरोध झाले तर ७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत १६ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत काही ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या प्रभागात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली नसल्याचे दिसून आले.पश्चिम भागातील धाकटी डहाणू, पोखरण, गुंगवाडा, बाडापोखरण, तडीयाले, अभ्राम - धुमकेत या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी( दि.२४ ) होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग हे काम पाहणार आहेत.पोखरण ग्रामपंचायतीत ७ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. गुंगवाडा येथे ७ पैकी एका जागेवर जयवंत हरेश्वर दवणे हे बिनविरोध निवडून आले मात्र ६ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.धाकटी डहाणूत १३ पैकी २ जागांसाठी नामनिर्देशन सादर केले नाही. येथे एका जागेसाठी निवडणूक होत असून दोन उमेदवार समोरासमोर उभे आहेत. ग्रामपंचायत बाडापोखरण (४ जागा), तडीयाले (४), अभ्रम - धुमकेत (7) या जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली नाहीत.
डहाणू तालुक्यातील निवडणुका शांततेत , आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:10 AM