- मंगेश कराळे नालासोपारा - वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फ़ोट झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत सात वर्षीय चिमुरड्याचा भाजल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शब्बीर अन्सारी (७) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
वसईच्या रामदास नगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी २३ सप्टेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे साडे पाचच्या सुमारास बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले. शब्बीर हा ७० ते ८० टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी श्री साई मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, २३ ते ३० सप्टेंबर दरम्यान उपचार सुरू असताना या ३० सप्टेंबरला या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. स्कुटी कंपनीच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे. माणिकपूर पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.