पालघर/नंडोरे : बोईसर येथे घेण्यात आलेल्या ४२ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक गटात नंडोरे आश्रमशाळेचा वीज व पाण्याची बचत साधणारा घरगुती टायमर हा प्रकल्प प्रथम क्र मांकाचा मानकरी ठरला. हा प्रकल्प महेंद्र सुतार व संदेश वरठा यांनी धनेश्वर चौधरी व मुख्याध्यापक विश्वास फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली होती. माझी स्वस्त घरगुती कल्पना या संकल्पनेवर आधारित असलेल्या वीज व पाणी बचतीचे हे टायमर वीज आणि पाणी याचा अनावश्यक वापर टाळते आणि बचतही साधते. घरगुती वापरात वीज आणि पाणी यांचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. पाणी वाहून जाते. गरज नसताना विजेची उपकरणे सुरु राहतात. हा नेहमीचा अनुभव तोच टाळण्यासाठी हा टायमर उपयुक्त ठरतो. या प्रकल्पाद्वारे या विद्यार्थ्यांनी पाणी व वीज बचतीचे स्वस्त यंत्र बनविले असून ते सर्वठिकाणी वापरात आणता येऊ शकते. बऱ्याच वेळा पाणी भरण्यासाठी मोटार पंप लावली किती ओतू जाईपर्यंत कोणी ती बंद करत नाही. पाण्याचा अपव्यय होतो तेव्हा या प्रयोगातील संकल्पनेनुसार मोटारपंपच्या वीज स्टार्टर बोर्डाच्या बटनात दोरीच्या साहायाने बाटली लटकत ठेऊन त्यात टाकीतून छोटे नळकांडे सोडावे व त्यास वेळेनुसार टायमर लावावे.तदनंतर बाटली या पाण्याने भरत जाऊन ती वजनदार होते व बटण त्या वजनाने खाली पडून ती मोटारपंप आपोआप बंद होते व पाण्याचा अपव्यय टाळता येतो त्याचप्रमाणे शेतीचा पाणी पंप, कुक्कुटपालन क्षेत्रात, शाळेत अभ्यास करताना, शहरातील इमारतींमध्ये व सार्वजनिक ठिकाणी वीज बचतीसाठी हा प्रयोग उपयुक्त असून त्याचा फायदा होणार आहे असे या प्रयोगाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे . या विज्ञान प्रदर्शनात स तु कदम विद्यालय पालघर यांच्या दीपाली जाधव व आचल पाटील या विद्यार्थिनींनी शिक्षक नम्रता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला टाकाऊपासून टिकाऊ निर्मिती हा प्रयोग द्वितीय क्र मांकाचा मानकरी ठरला.तर यमुना निजप हायस्कूल शिरगाव च्या सुंदर राजपूत व निवेदिता पाटील या विद्यार्थिनींनी शिक्षक नितीन भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या वीज विरहीत पंप प्रयोगास तृतीय क्र मांक मिळाला आहे. (वार्ताहर)
वीज, पाणी टायमर प्रथम
By admin | Published: December 26, 2016 6:03 AM