वसई : संपूर्ण देश व राज्यभरात सर्वत्र कोरोनाचे वाढते संक्रमण असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाट विजबिले पाठवून अडचणीच्या दरीत लोटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने महावितरणच्या तुघलकी कारभाराविरोधात मंगळवारी दुपारी १२ वा. चड्डी-बनियान परिधान करून वसई रोड येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.महावितरण कंपनीला दिलेल्या या निवेदनात शिवसेनेने वीज कंपनीने कशा प्रकारे अवाजवी बिले पाठवली आहेत, याची पोलखोल केली आहे. या प्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण, उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक, एक शाखाप्रमुख व एक शिवसैनिक उपस्थित होते.महावितरण कंपनीने पाठवलेली बिले व एकूणच सरासरी आकडेवारी चुकीची व तुघलकी पद्धतीची आहे. महावितरणने ही चूक सुधारून नागरिकांना दिलासा द्यावा. बिले नागरिकांना देत असताना सरासरीच्या नावाखाली जी आर्थिक पिळवणूक महावितरणने केली आहे, त्याची पोलखोल आम्ही वीज कंपनीला सादर केल्याचे उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.महावितरणला जर योग्य वीज सरासरी आकारणी करायची होती, तर मागील फेब्रुवारी २०१९ ते मे २०१९ या चार महिन्यांची सरासरी काढायला हवी किंवा वर्षभरातील १२ महिने पकडून प्रत्येक महिन्याची सरासरी काढणे इष्ट ठरले असते. यामुळे लोकांनाही मानसिक त्रास झाला नसता, असेही ते म्हणाले.कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यात लोकांच्या हाताला काम नाही. यामुळे उपासमारदेखील सुरू झालेली आहे. त्यामुळे लोकांच्या तोंडचे पाणी तर गेलेच, मात्र अंगावरचे कपडेदेखील उतरवले आहेत. त्यात महावितरणने ही अवाजवी बिले पाठवून उरलेले अंगावरचे कपडे उतरवू नयेत यासाठी अशा पद्धतीने आम्ही निवेदन दिले.- मिलिंद चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख, वसई रोड‘कोरोना’प्रमाणेच वीजबिलाचा शॉक, मुख्यमंत्र्यांना निवेदनडहाणू : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यातील लोकांचा रोजगार बुडाला आहे. घरातच बसून राहावे लागत असल्याने रोजंदारीवर जाणे लोकांना शक्यच होत नाही. मात्र, मागील तीन महिन्यांत डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात राहणाºया गोरगरिबांना महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याने सर्वसामान्य जनतेला कोरोनाप्रमाणेच शॉक बसला आहे.घरातील सदस्यांना दोन वेळचे जेवण मिळवण्याची भ्रांत असताना हे वीजबिल कसे भरावे, या विवंचनेत शहरी व ग्रामीण भागातील जनता आहे. हे वीजबिल माफ करावे यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमित घोडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात त्यांनी वीजबिल माफ करण्याची भूमिका मांडली आहे. डहाणूसह पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना कोरोना काळातील वीजबिल कित्येक पटीने जास्त आल्याने लोकांना जबर शॉक बसला आहे. महावितरणने ग्राहकांना वीज बिल देताना मागील सरासरीप्रमाणे दिले आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना आलेल्या वीजबिलातील रकमेचा वाढीव आणि मोठा आकडा पाहून चिंता वाढली आहे. यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन अमित घोडा यांनी केले आहे.वीज बिले कमी करा; श्रमजीवीचे आंदोलनपालघर : लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व काही बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद होते. मात्र तरीही लॉकडाऊन काळात महावितरण कंपनीमार्फत नागरिकांना एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अवास्तव वीज बिल व वाढीव वीज बिल देण्यात आले आहे. या वाढीव वीज बिलांबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून वीज बिलात तत्काळ कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे पालघर येथील महावितरण कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत धरणे आंदोलन करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार, खासगी नोकरदार व लहान उद्योगधंदा करणारे व्यापारी घरात अडकून पडले होते. लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद असल्याने तसेच उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसल्याने सामान्य नागरिकांचे उपासमारीने हाल झाले आहेत. असे असताना सर्वसामान्य नागरिकांना वीज वितरण कंपनीमार्फत मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अवास्तव वीज बिल आले असून याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या अवास्तव व वाढीव वीज बिलात तत्काळ कपात करण्यात यावी, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे पालघर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी, मनसे आदी पक्षांच्या प्रतिनिधींनी अधीक्षक अभियंत्या किरण नागावकर यांची भेट घेत वीज बिलामध्ये तत्काळ कपात करावी, खराब झालेले विजेचे खांब तत्काळ बदलून द्यावेत, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.