पालघर: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे निमित्त साधून पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील नांदबादेवी मंदिरात 'तृणधान्याचे फायदे' या विषयावर शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.
पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजारी, नाचणी, वरई, राळा, कोद्रा, कुटकी, सावा, राजगिरा व इतर पिकांचा समावेश होतो. मात्र, लहान मुले, मुली, गर्भवती स्त्रिया यांना सध्या या पोषणयुक्त आहारापासून दुरावत चालले आहेत. तृणधान्य पिकांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारातील पौष्टिकतेचे प्रमाण वाढविण्यासाठी, कृषी विभागातर्फे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शेतकरी वर्गाने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे, असे मत यावेळी कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक सी.व्ही. मोकाशी यांनी व्यक्त केले.
'आजच्या तरुणांची जंकफूडला अधिक पसंती असते, परंतु त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. त्यामुळे शीतपेये, बाहेरचे पदार्थ, जंकफूड आदींचे सेवन न करता पौष्टिक तृणधान्ये सेवन करा व इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून द्या,' असे आवाहन नांदगाव तर्फे तारापूर गावातील सरपंच समीर मोरे यांनी शेतकरी बंधू भगिनींना आपल्या भाषणात केले. तसेच पौष्टिक तृणधान्याच्या सेवनामुळे विविध आजारांना प्रतिबंध करता येतो, त्यामुळे तृणधान्याचा आहारात आवर्जून समावेश करावा, असे आवाहन कृषि सहाय्यक तनुजा मुकणे यांनी केले.
कृषी सहाय्यक रेखा पाटील, प्रितम गोवारी व गावाचे कृषी सहाय्यक योगेश साळुंके यांनी पौष्टिक तृणधान्यचे पंचनसंस्थेवरील फायदे सांगितले. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्.या विविध योजनेद्वारे तृणधान्य उत्पादन व लागणारी बाजारपेठ कशी उपलब्ध करून घेता येईल याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तेजस्वी घरत, दीपा पाटील, गावातील विविध गटाचे गट प्रमुख व महिला व पुरुष शेतकरी वर्गही उपस्थित होते .