शशी करपे / वसईवसई पंचायत समितीच्या उपसभापतींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी गुर चरण जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असून त्याला घरपट्टी लावण्यासाठी ग्रामपंचायतीनेही बेकायदा ठराव केल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर शर्तीची जमीन विकल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्पाळा येथील सर्व्हे क्रमांक ५० ही सरकारी गुरेचरण जागा सन १९४३ ला आंद्रुळ सोवार सोज यांना दहा वर्षांसाठी दिली होती. हा हुकुम रद्द झाल्यानंतर ती व्हीलेज पंचायत वटार यांच्याकडे मॅनेजमेंटसाठी दिली होती. मात्र, या जागेवर तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा वसई पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी अतिक्रमण करून घर बांधल्याची तक्रार लक्ष्मण पंडित भोई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या जागेवरील झोपडीवजा घराला घरपट्टी लावण्यासाठी आपल्या लेटरपॅडचा वापर करून एक अर्ज ठाकूर यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केला होता. त्यावर कोणतीही चौकशी न करता या अनधिकृत घराला २४ डिसेंबर १२ च्या सभेत ५/८ च्या ठरावाने घरपट्टी लावण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. घरपट्टी लावताना मात्र, त्यावर अनधिकृतचा शिक्का मारण्यात आलेला नाही. त्यामुळे शास्ती बुडवण्यात आल्याचेही उजेडात आले आहे. ठाकूर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी जमीन बळकावली आणि त्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून त्वरीत दूर करण्यात यावे. बेकायदा घरपट्टी लावणाऱ्या ठरावाला मान्यता देणाऱ्या सर्व सदस्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भोई यांनी केली आहे. सर्व्हे क्रमांक १३४, हिस्सा क्रमांक १/१ पैकी १/५ या क्षेत्रात खाजग जमीन आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण करण्यास मनाई आहे. तसा उल्लेख ७/१२ उताऱ्यावर आहे, असे असताना ठाकूर यांनी त्या जागेवर ग्रामपंचायतीच्या ३१ जुलै २०१४ च्या सभेत ठराव क्रमांक ५/१० अन्वये स्वत:च्या नावाने घरपट्टी लावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. सदर जागा नारायण हरी पाटील यांच्या नावे आहे. मात्र वारस तक्त्यात भालचंद्र नारायण पाटील यांचे नाव नसतांना त्यांच्या नावाने ६ फेब्रुवारी २००९ रोजीचे जमीन विकत घेत असल्याचे संमतीपत्र तयार केले आहे. संमतीपत्रात इतर वारसदारांची संमती न घेता स्वत: विकत घेतल्याची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन ठाकूर यांनी लक्ष्मण चेलंगी यांना विकूनही टाकली. ती शर्तीची असताना ठाकूर यांनी बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याची तक्रार आहे.
उपसभापतींनीच केले अतिक्रमण
By admin | Published: April 26, 2017 12:00 AM