लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मुंबई - अहमदाबाद महामार्ग जवळील दहिसर तर्फे मनोर येथे वृद्धापकाळाने निधन झालेल्या सासूवर सुनेलाच अंत्यसंस्कार करावे लागले. कोरोनामुळे नातेवाईक येऊ न शकल्याने सासूला सुनेनेच मुखाग्नी दिला. २० वर्षे सांभाळ करून शेवटी अंत्यसंस्कार ही केल्याने तिचे पालघर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.अलीकडच्या काळात सासू आणि सुनाचे अजिबात न पटण्याचे प्रकार सर्वत्र घडत असतात, मात्र अंथरुणास खिळलेल्या सासूचा सुनेने सांभाळ करतानाच अंत्यसंस्कार ही पार पाडून नीता गोडांबे या सुनेने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. सासू ताराबाई गोडांबे यांचे मंगळवारी वृद्धापकाळने निधन झाले. काेरोनामुळे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. पाटबंधारे खात्यात नोकरी करणारे नीता यांचे पती नंदकुमार यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने नंदकुमार गोडांबे यांच्या निधनानंतर त्यांची वयोवृद्ध आई ताराबाई यांचा नीता सांभाळ करीत होत्या.मंगळवारी ताराबाई गोडांबे यांचे निधन झाले. ताराबाई यांच्या नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातून दहिसर गावात अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले होते. त्यामुळे मयत ताराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस ताराबाई यांच्या सूनबाई नीता गोडांबे यांनी पुढाकार घेत चितेला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. सर्व निर्बंधांचे पालन करीत नीता गोडांबे यांचे दोन भाऊ आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. नीता यांनी सासूचे अंत्यविधीचे सोपस्कार स्वत:हून पार पाडले.
अखेर सूनच बनली तिचा मुलगा... सासूवर केले रीतसर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:02 AM