हितेन नाईक/शौकत शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/डहाणू : वाढवण बंदराला तत्त्वता मान्यता दिल्याने डहाणूसह किनारपट्टीवर संतप्त भाव उमटत असून केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या बंदराच्या समर्थनार्थ डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचे फोटो असलेल्या बॅनरवरील त्यांच्या फोटोला अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी रात्री काळे फासत आपला रोष व्यक्त केला.
केंद्र सरकारने ६५ हजार कोटींच्या वाढवण बंदरास तत्त्वत: मान्यता दिल्याने वाढवण, वरोर, चिंचणी, धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, बाडापोखरण सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेळी दांडी, तारापूर, वडराई, केळवे या किनारपट्टीवरील गावांत संतापाची लाट उसळली आहे. मागील २० वर्षांपासून स्थानिकांच्या सुरू असलेल्या लढ्यानंतर डहाणू पर्यावरण प्राधिकरण व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची भूमिका, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचा असलेला विरोध आदी कारणांमुळे केंद्र सरकारला हे बंदर उभारता आले नव्हते. या बंदराविरोधात आजवर अनेक आंदोलने, मोर्चे, मतदानावर बहिष्कार आणि न्यायालयीन लढा आधी आयुधे स्थानिकांनी वापरून या बंदराविरोधात आपला लढा तीव्र केला होता. या बंदराच्या उभारणीमुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, डायमेकार उद्ध्वस्त होत पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने आपली ही निसर्ग संपदा वाचविण्यासाठी इथला स्थानिक नानाविध प्रकारे लढे उभारीत असताना डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजपूत यांचा फोटो असलेले व या बंदराच्या उभारणीमुळे डहाणू तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीस सुरुवात होणार असल्याचे वाढवण बंदराच्या समर्थनार्थ बॅनर नगर परिषद क्षेत्रातील डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या भिंतीसह अनेक भागात लावण्यात आले होते. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर झळकू लागल्यानंतर नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या विरोधात संतप्त भाव उमटू लागले होते. त्यामुळे रात्री काही अज्ञात व्यक्तींनी वाढवण बंदर समर्थनार्थ उभारलेल्या बॅनरवरील नगराध्यक्षांच्या फोटोला काळे फासत आपला बंदरविरोधातील संताप व्यक्त केला होता. हा प्रकार सकाळी निदर्शनास येताच हे बॅनर हटविण्यात आले आहेत.लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णयवाढवण बंदरविरोधी आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी झालेल्या वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या सभेत, वाढवण बंदराचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेऊन, केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्व नियम, कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आणि शेतकरी, बागायतदार, मच्छीमारांना उद्ध्वस्त करणाºया वाढवण बंदर उभारणीस तत्त्वत: मान्यता देणाºया केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निषेधार्थ रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता वाढवण मुंडेश्वरी देवालयासमोर, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे.