- लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळांत आणि आश्रमशाळांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे भावपूर्ण व उत्साही स्वागत झाले. कुठे त्यांच्या स्वागतासाठी बैलगाडीतून मिरवणूक निघाली तर कुठे रांगोळ्या घालून तर कुठे ढोलताशांच्या नादात त्यांचे स्वागत केले गेले. वर्गात आल्यावर गुलाबाची फुले, खाऊ मिळाल्यामुळे तर त्यांच्या आनंदात भरच पडली. जी पहिल्यांदाच शाळेत आली त्यातील काहींनी हा क्षण रडून तर काहींनी कुतूहलपूर्ण उत्साहाने साजरा केला. काही नवख्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पहायला मिळत असले तरी अनेकांच्या चेहऱ्यावर शाळा म्हणजे काय ही उत्सुकताही होती. विक्रमगड तालुक्यातील २३७ जिल्हा परिषद शाळा आज सुरु झाल्या असून इयत्ता पहिली ते पाचवीचे १७०१७ तर इयत्ता ६ वी ८ पर्यतच्या ३६६३ विद्यार्थ्यांनी गुरुवारी हजेरी लावली होती. जि. प. शाळांना यावर्षीही मोफत पाठयपुस्तके व गणवेष मिळालेली आहेत. फेब्रुवारी महिन्यात नव्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांची पटनोंदणी करण्यांत आली होती. कोणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये म्हणुन शंभर टक्के पटनोंदणी करुन मुलांना शाळेत दाखल करुन घेण्यात आले आहे़बैलगाडीतून मिरवणूकसफाळे : जि.प.च्या शिलटे माकणे या शाळे मध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. वाजतगाजत लेझीम च्या तालावर तसेच बैलगाडीतून नवागतांची मिरवणूक काढण्यात आली. त्या निमित्ताने पुस्तक दिंडी व सांस्कृतिक कार्यक्र मचे देखील आयोजन करण्यात आले होते. मुलांचे औक्षण करून व लेखन साहित्य,खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील शाळांत प्रवेशोत्सव
By admin | Published: June 16, 2017 1:52 AM