वसई : नालासोपारा येथे शुक्रवारी झालेल्या युतीच्या जाहीर सभेत उपस्थित नेत्यांनी केलेल्या विखारी प्रचारावरून सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून वातावरणही तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. या सभेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणमंत्र्यांनी त्यांना थेट दोन महिने जेलमध्ये पाठवण्याची गर्भीत धमकीच दिली. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने युतीच्या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला असला तरी जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये भाजपने बहुजन विकास आघाडीला जवळ करत सेनेला धोबीपछाड दिल्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ही टीका केली असल्याची चर्चा होत आहे.राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्यासह पक्षाच्या ३ आमदारांचा फडणवीस सरकारला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये भाजपने बहुजन विकास आघाडीशी हातमिळवणी करून सेनेला सत्तेपासून दूर राखले होते. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत सेना-भाजप युती झाली. शनिवारी झालेल्या युतीच्या या सभेत आघाडीच्या एकंदरीत कारभारावर सर्वच वक्त्यांनी टीकास्त्र सोडले. सेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख असणारे अनंत तरे यांनी दोनच दिवसापूर्वी ठाण्यामध्ये भाजपवर लबाडीचा आरोप केला होता. ते ही व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. त्यांनी भाजपची ताकद नसतानाही आम्ही त्यांना ४० जागा दिल्या परंतु त्या पक्षाचे काही उमेदवारी अर्ज फेटाळले गेले. तर बविआच्या प्रमुख उमेदवाराविरूद्ध असलेल्या भाजपच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. या घडामोडीमुळे भाजपने आमच्याबरोबर लबाडी केली असे स्पष्ट वक्त व्य केले होते. त्याच व्यासपीठावरून भाजप व सेना नेत्यांनी ठाकूरांवर विखारी टीका केली. जिल्हापरिषदेमध्ये आपण हातात हात घालून काम करीत आहोत हे पालकमंत्री सवरा व भाजपचे नेते सोयीस्करपणे विसरले. तर भाजपने दोनदा तोंडघशी पाडल्यानंतरही सेना नेते युतीच्या हाती सत्ता सोपवा असे सांगत होते. हा विरोधाभास लक्षात घेता राज्यात युतीचे सरकार असले तरी, जिल्ह्यात या दोघांमध्ये योग्य तो समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास कदमांच्या या टीकेला आमदार ठाकूर कसे उत्तर देतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
युतीच्या व्यासपीठावरून पर्यावरणमंत्र्यांची टीका
By admin | Published: June 08, 2015 4:28 AM